Home बातम्या पाकिस्तानात लष्करी उठावाचे सावट

पाकिस्तानात लष्करी उठावाचे सावट

0

राष्ट्राध्यक्ष झरदारी दुबईला निसटले

लष्करप्रमुखांनी घेतली खास बैठक

पाकिस्तानात सरकार व लष्करात संबंध ताणले गेल्यानंतर लष्करी उठावाची शक्यता वर्तविण्यात येत असतानाच काल अचानकपणे पाकिस्तानच राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी दुबईला निघून गेले.

दरम्यान, लष्करप्रमुख जन. अश्फाक परवेझ कयानी यांनी लष्कराच्या वरिष्ठ कमांडर्सची बैठक घेऊन काल चर्चा केली. रावळपिंडी येथील लष्कर मुख्यालयात ही बैठक झाली. याला कमांडर्स वगळता अन्य वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. बैठकीत काय विषयांवर चर्चा झाली त्याबाबत मात्र गुप्तता पाळण्यात आली आहे.

दुसरीकडे पाकिस्तानी संसदेच्या नॅशनल असेंब्लीचेही खास अधिवेशन घेण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाकडून पंतप्रधान व राष्ट्राध्यक्षांविरुद्ध कारवाईच्या संकेतांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

दरम्यान, पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी संरक्षण सचिवांना गैरसमज निर्माण केल्याच्या आरोपावरून बडतर्फ केल्यानंतर सरकार व लष्कर यांच्यातील संबंध चिघळण्याची शक्यता होती. मात्र दोन्ही बाजूंनी संयम पाळल्याचे दिसून आले तरी पेच कायम आहे. पंतप्रधानांकडून लष्कर प्रमुख अश्फाक कयानी व आयएसआयचे प्रमुख शुजा पाशा यांच्यावरील संभाव्य कारवाई काल झाली नाही, दुसर्‍या बाजूने लष्करप्रमुखांनीही आपल्या कमांडर्सची बोलावली बैठक घेतलीच नाही.

दरम्यान, काल राष्ट्राध्यक्ष झरदारींचे दुबईला प्रयाण हे महत्त्वपूर्ण घटना होती. ते तिथे खासगी लग्नसमारंभाला तसेच वैद्यकीय तपासणीसाठी गेले असून आज लगेच परततील असे सांगण्यात आले.

एका मोठ्या घोटाळ्याचा खटला सध्या पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात चालू असून त्यात राष्ट्राध्यक्ष झरदारी यांचेही नाव आहे. या प्रकरणी पंतप्रधान गिलानी यांनी कारवाई केली नसल्याबद्दल कोर्टाने त्यांच्यावरही ताशेरे ओढले होते.दरम्यान, कोर्टाने गिलानी यांच्यावर कारवाई केली तर पाकिस्तानात निवडणूकाही घोषित होण्याची शक्यता आहे. गिलानी यांनी लष्करावर टीका केल्यानंतर लष्कराने प्रत्युत्तरदाखल ‘गंभीर परिणामांची’ तंबी दिली होती. ओसामा बिन लादेनवरील कारवाईनंतर पाकिस्तानात लष्करी राजवट थोपविण्यासाठी पाकिस्तान सरकारने अमेरिकी लष्कराची मदत मागितल्याचा गौप्यस्फोट अमेरितेकील मूळ पाकिस्तानी उद्योजक मन्सूर इजाज यांनी केल्यानंतर या वादाला तोंड फुटले होते.