सामनावीर डेव्हिड वॉर्नरच्या पंधराव्या एकदिवसीय शतकानंतर पॅट कमिन्स व मिचेल स्टार्क या वेगवान जोडगोळीच्या भेदक मार्याच्या जोरावर विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाने काल बुधवारी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात पाकिस्तानचा ४१ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानसमोर ३०७ धावांचे आव्हान उभे केले होते. या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव ४५.४ षटकांत २६६ धावांत आटोपला.
तत्पूर्वी, सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचे शतक आणि कर्णधार ऍरोन फिंचने यांनी दिलेल्या १४६ धावांच्या दमदार सलामीनंतरही कांगारूंचा डाव ४९ षटकांत ३०७ धावांत आटोपला. मोहम्मद आमिरने ऑस्ट्रेलियन कर्णधार ऍरोन फिंचला माघारी धाडत कांगारुंना पहिला धक्का दिला. फिंचने २४वे वनडे अर्धशतक लगावले. त्याने ८४ चेंडू खेळताना ६ चौकार व ४ षटकारांसह ८२ धावा केल्या. यानंतर डेव्हिड वॉर्नरने स्मिथच्या साथीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. माजी कर्णधार स्टीव स्मिथ आणि चौथ्या क्रमांकावर बढती मिळालेला ग्लेन मॅक्सवेल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात माघारी परतले. या दरम्यान वॉर्नरने आपले १५ शतक साजरे केले. पाकिस्तानविरुद्धचे त्याचे हे सलग तिसरे व विश्वचषकातील दुसरे शतक ठरले. शतकानंतर त्याला लगेच आसिफ अलीने जीवदान दिले. मात्र १०७ धावांवर तो ही माघारी परतला. यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनी हाराकिरी करत विकेट फेकण्यास सुरुवात केली. मोहम्मद आमिर, शाहिन आफ्रिदी यांनी भेदक मारा करत कांगारुंची अखेरची फळी कापून काढली. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिरने केवळ ३० धावांत ५ बळी घेतले. शाहिन आफ्रिदीने २ तर हसन अली, वहाब रियाझ व मोहम्मद हफीझ यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
धावफलक
ऑस्ट्रेलिया ः ऍरोन फिंच झे. हफीझ गो. आमिर ८२, डेव्हिड वॉर्नर झे. इमाम गो. आफ्रिदी १०७ (१११ चेंडू, ११ चौकार, १ षटकार), स्टीव स्मिथ झे. आसिफ गो. हफीझ १०, ग्लेन मॅक्सवेल त्रि. गो. आफ्रिदी २०, शॉन मार्श झे. मलिक गो. आमिर २३, उस्मान ख्वाजा झे. रियाझ गो. आमिर १८, आलेक्स केरी पायचीत गो. आमिर २०, नॅथन कुल्टर नाईल झे. सर्फराज गो. वहाब २, पॅट कमिन्स झे. सर्फराज गो. हसन २, मिचेल स्टार्क झे. मलिक गो. आमिर ३, केन रिचर्डसन नाबाद १, अवांतर १९, एकूण ४९ षटकांत सर्वबाद ३०७
गोलंदाजी ः मोहम्मद आमिर १०-२-३०-५, शाहिन शाह आफ्रिदी १०-०-७०-२, हसन अली १०-०-६७-१, वहाब रियाझ ८-०-४४-१, मोहम्मद हफीझ ७-०-६०-१, शोएब मलिक ४-०-२६-०
पाकिस्तान ः इमाम उल हक झे. केरी गो. कमिन्स ५३, फखर झमान झे. रिचर्डसन गो. कमिन्स ०, बाबर आझम झे. रिचर्डसन गो. कुल्टर नाईल ३०, मोहम्मद हफीझ झे. स्टार्क गो. फिंच ४६, सर्फराज अहमद धावबाद ४०, शोएब मलिक झे. केरी गो. कमिन्स ०, आसिफ अली झे. केरी गो. रिचर्डसन ५, हसन अली झे. ख्वाजा गो. रिचर्डसन ३२, वहाब रियाझ झे. केरी गो. स्टार्क ४५, मोहम्मद आमिर त्रि. गो. स्टार्क २, शाहिन शाह आफ्रिदी नाबाद १, अवांतर १४, एकूण ४५.४ षटकांत सर्वबाद २६६
गोलंदाजी ः पॅट कमिन्स १०-०-३३-३, मिचेल स्टार्क ९-१-४३-२, केन रिचर्डसन ८.४-०-६२-२, नॅथन कुल्टर नाईल ९-०-५३-१, ग्लेन मॅक्सवेल ७-०-५८-०, ऍरोन फिंच २-०-१३-१