भारत- न्यूझीलंड आज आमनेसामने

0
126

>> मुसळधार पावसामुळे हिरमोड होण्याची शक्यता

भारत व न्यूझीलंड हे तुल्यबळ प्रतिस्पर्धी आज क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेत आमनेसामने येणार आहेत. उभय संघांनी आत्तापर्यंत आपली अपराजित घोडदौड कायम राखली असूून पाऊस दूर राहिल्यास एका संघाच्या दौडीला आज ब्रेक लागू शकतो. न्यूझीलंडने तीन व भारताने आपल्या दोन्ही सामन्यात विजय प्राप्त केला आहे. पावसामुळे सामना रद्द होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असल्यामुळे चाहत्यांचा हिरमोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

स्पर्धेतील सर्वांत समतोल संघांमध्ये न्यूझीलंडचा संघ आघाडीवर आहे. फलंदाजीमध्ये केन विल्यमसनच्या रुपात कुशल कर्णधार व तंत्रशुद्ध फलंदाज त्यांच्याकडे आहे. गप्टिल मन्रोसारखे स्फोटक फलंदाज त्यांच्या ताफ्यात आहेत. रॉस टेलरच्या रुपात दीर्घ अनुभव गाठीशी असलेला खेळाडू न्यूझीलंडच्या फलंदाजी फळीला बळकटी देण्याचे काम करत आला आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजांचे काम सोपे होणार नाही. न्यूझीलंडकडून मॅट हेन्री व लॉकी फर्ग्युसन या दोन्ही जलदगती गोलंदाजांनी प्रभावी मारा केला आहे. आपल्या वेगाने प्रत्येकवेळी या दुकलीने प्रतिस्पर्धी संघाला बॅकफूटवर ठेवण्याचे काम केले आहे. स्विंग गोलंदाज ट्रेंट बोल्ट, अष्टपैलू जिमी नीशम, मिचेल सेंटनर व कॉलिन डी ग्रँडहोम यांनी मोक्याच्या क्षणी विकेट घेत जोडी ब्रेकरचे काम केले आहे.

पहिल्या दोन लढतीत खेळपट्टीची साथ भारतीय गोलंदाजांना लाभली होती. नाणेफेकीचा कौलदेखील निर्णायक ठरला होता. परंतु, आजच्या सामन्यासाठी याच प्रकारची अपेक्षा करणे योग्य होणार नाही. शिखर धवनच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे. मधल्या फळीत विजय शंकर किंवा रवींद्र जडेजाच्या रुपात अष्टपैलू खेळवावा की दिनेश कार्तिकला खेळवून फलंदाजी अधिक बळकट करावी याचा कठीण निर्णय संघ व्यवस्थापनाला करावा लागेल. केदार जाधवच्या संघातील स्थानाबाबत व त्याच्या भूमिकेबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे. त्याची गोलंदाजी पहिल्या दोन्ही सामन्यात न चालल्याने संघाला सहाव्या गोलंदाजाची कमतरता जाणवू शकते. मैदानावर हिरवळ असल्यास कुलदीप यादवच्या जागी मोहम्मद शमीला उतरवण्याचा पर्याय टीम इंडियाकडे आहे.