पहिल्या चार्टर विमानातून १५९ विदेशी पर्यटक दाखल

0
25

दोन वर्षांच्या खंडानंतर आज गोव्यात पहिले चार्टर विमान १५९ प्रवाशांना घेऊन दाखल झाले. अल्माटी कझाकिस्थान येथून हे चार्टर विमान काल बुधवारी सकाळी दाबोळी विमानतळावर उतरले. या पर्यटकांच्या स्वागतासाठी विमानतळावर खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सन २०२० मध्ये मार्चमध्ये कोरोना संसर्गामुळे चार्टर पर्यटक हवाई सेवा खंडित करण्यात आली होती. त्यानंतर एकाही चार्टर पर्यटकांचे विमान गोव्यात आले नाही.

मागचा पर्यटन हंगामही कोरोनामध्येच गेला होता. त्यामुळे त्यावेळी चार्टर हवाई सेवा सुरू झाली नव्हती. मात्र, नुकतीच कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने काही चार्टर विमाने रशियाहून गोव्यात येण्याच्या तयारीत आहेत. दाबोळी विमानतळ प्राधिकरणानेही तशी सज्जता ठेवलेली आहे.

पहिले चार्टर विमान १५९ प्रवाशांसह काल बुधवारी सकाळी दाबोळी विमानतळावर उतरले. कोविड महामारी सावटाखाली एअर अस्ताना हे चार्टर विमान १५९ विदेशी प्रवाशांना घेऊन सकाळी ७ वाजता उतरल्यानंतर प्रवाशांच्या स्वागतासाठी दाबोळी विमानतळावर खास कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूक तथा पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, विमानतळ संचालक गगन मलिक उपस्थित होते. यावेळी वाहतूक मंत्री गुदिन्हो यांच्या हस्ते केक कापून या चार्टर फ्लाईट पर्यटन हंगामाची सुरुवात केली.

यावेळी पर्यटकांचे पर्यटन खात्याने गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. तसेच बँड वादनाची खास व्यवस्था करण्यात आली होती.
दरम्यान चार्टर विमानातून आलेल्या पर्यटकांची रॅपिड कोविड चाचणीची व्यवस्था पार्किंग इमारतीत करण्यात आली होती. यावेळी खास वैद्यकीय पथक तैनात ठेवण्यात आले होते. त्यांची कोविड चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल मिळेपर्यंत त्यांना तिथे बसवून ठेवण्यात आले. चाचणीचा अहवाल आल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. दाबोळी विमानतळ संचालक जगन मलिक यांनी आज पहिले चार्टर विमान दाखल झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. डिसेंबर अखेरपर्यंत आणखी विमाने दाखल होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.