पश्‍चिम बंगालमध्ये प्रचारासाठी कॉंग्रेसतर्फे ३० बडे नेते मैदानात

0
61

पश्चिम बंगालमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. कॉंग्रेस पक्षाने काल आपल्या ३० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे भाजपने गुरूवारी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केल्यानंतर २४ तासांच्या आत ही यादी जाहीर केली आहे. पश्‍चिम बंगालमध्ये येत्या २७ मार्च रोजी पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे.

कॉंग्रेसने जाहीर केलेल्या या यादीमध्ये कॉंग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी, उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासह पक्षातल्या अनेक दिग्गज नेतेमंडळींचा समावेश आहे.
भाजपाने एक दिवस आधी आपली स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, अभिनेते मिथुन चक्रवर्ती, यश दासगुप्ता, श्रबंती चटर्जी, पायल सरकार, हिरेन चटर्जी, केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, जुअल ओराम, नितीन गडकरी, स्मृती इराणी यांचा समावेश आहे.

भाजपाच्या या प्रचारकांना टक्कर देण्यासाठी कॉंग्रेसकडून सोनिया गांधी मैदानात उतरल्या आहेत. त्यांच्यासोबत राहुल गांधी, प्रियांका गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, मल्लिकार्जुन खर्गे, अशोक गेहलोत, सचिन पायलट, नवज्योतसिंग सिद्धू, कमलनाथ, भूपेश बघेल, कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा समावेश आहे. मात्र यात महाराष्ट्रातील एकाही नेत्याचा समावेश नाही.

८ टप्प्यांमध्ये मतदान
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये एकूण ८ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यासाठी २७ मार्च रोजी मतदान होणार आहे. तर शेवटच्या आठव्या टप्प्यासाठी २९ एप्रिल रोजी मतदान होणार असून २ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे.