>> इस्पितळातून परतताना पोलिसांवर केला होता गोळीबार
इस्पितळातून परतताना पोलिसांवर गोळीबार करत पलायन केलेल्या कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील विवेक गौतम ऊर्फ आर्यन (२८, आग्रा, उत्तर प्रदेश) या कैद्याला पोलिसांनी २४ तासांच्या आत शिताफीने पकडले. वैद्यकीय तपासणीसाठी म्हापसा जिल्हा इस्पितळात आणले असता त्याने दोघा साथीदारांच्या मदतीने पळ काढला होता. यावेळी इस्पितळापासून शंभर मीटर अंतरावरच विवेकच्या साथीदारांनी पोलिसांवर गोळीबार केला. ही घटना मंगळवार दि. २९ रोजी रात्री ११.३० च्या सुमारास घडली होती. विवेकला मंगळवारी रात्री कारागृहात पोटदुखी व उलट्या सुरू झाल्याने त्याला रुग्णवाहिकेतून म्हापसा जिल्हा इस्पितळात आणले.
यावेळी त्याच्यासोबत हेडकॉन्स्टेबल राजेश सराफ आणि कॉन्स्टेबल नितीन आंबेडकर होते. त्यावेळी कैदी विवेक आणि कॉन्स्टेबल नितीन यांच्या एका हातात बेड्या होत्या.
तपासणीनंतर त्याला कारागृहात नेण्यासाठी पोलीस बाहेर आले. त्यावेळी रुग्णवाहिका नव्हती. त्यामुळे नितीन हे रुग्णवाहिका पाहण्यासाठी पायर्या उतरून खाली वाहनतळाकडे जात असताना विवेकने जोरात हात झटकल्याने हातबेडी तुटली आणि त्याने तेथून पळ काढला. कॉन्स्टेबल नितीन त्याचा पाठलाग करू लागले. मात्र, इस्पितळाच्या फाटकावर आधीच दबा धरून बसलेल्या विवेकच्या एका साथीदाराने कॉन्स्टेबलच्या डोळ्यांवर स्प्रे मारला. त्याचवेळी त्याचा दुसरा साथीदार तेथे दुचाकी घेऊन आला आणि विवेक त्याच्या दुचाकीवर बसून पळाला. यावेळी नितीन यांनी स्प्रे मारणार्याला पकडले. आपला साथीदार पोलिसांशी झगडत असल्याचे विवेक व त्याचा साथीदार दोघेही माघारी आले. त्यांनी नितीन यांच्या दिशेने गोळी झाडली. त्यावेळी नितीन हे बचावासाठी रस्त्यावर पडले. यावेळी तिघांनीही दुचाकीवरून पळ काढला. यानंतर तपास करत पोलिसांच्या पथकांनी पत्रादेवी तपासणी नाक्यापर्यंत शोध घेतला. सीसीटीव्हीच्या साहाय्याने पोलीस संशयिताचा शोध घेत आहेत.
कैद्याला मोरजीतून ताब्यात
पळून गेलेला कैदी विवेक याला गुन्हा अन्वेषण विभागाने मोरजी-पेडणे येथून ताब्यात घेतले. या प्रकरणातील विवेक याला पळून जाण्यास साहाय्य करणार्या इतर दोघांचा शोध सुरू आहे.