शेतकर्‍यांसोबतच्या चर्चेत दोन मुद्द्यांवर सहमती

0
135

>> केंद्रीय कृषिमंत्र्यांची माहिती

केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकरी प्रतिनिधी यांच्यात काल नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात झालेल्या चर्चेच्या सहाव्या फेरीत शेतकर्‍यांच्या चारपैकी दोन मागण्यांवर सरकार व शेतकर्‍यांत सहमती झाल्याची माहिती काल केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली. तसेच शेतकर्‍यांसोबत पुन्हा ४ जानेवारी रोजी चर्चा होणार असल्याचे मंत्री तोमर यांनी सांगितले.

मंत्री तोमर म्हणाले की, सरकारने शेतकर्‍यांकडे एमएसपी यापुढेही सुरूच राहील असे स्पष्ट केले आहे. त्याबाबत पाहिजे असेल तर लेखी स्वरूपातही देण्यास सरकार तयार आहे. शेतकर्‍यांनी एमएसपीला कायदेशीर रूप देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे याबाबत पुढील चर्चा दि. ४ जानेवारी रोजी दुपारी २ वा. होईल.
राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेले ३५ दिवस शेतकरी नवीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. आंदोलकांशी सरकारने केलेल्या चर्चा निष्फळ ठरल्या. काल चर्चेची सहावी फेरी झाली.
कृषिमंत्री तोमर यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, कालच्या बैठकीनंतर आता दि. ४ जानेवारी रोजी पुढील बैठक होईल.

या बैठकीत एमएसपी हमी आणि तिन्ही कृषी कायद्यांसंदर्भात चर्चा होणार आहे. यासाठी एका समितीची नियुक्ती केली जाईल. कालच्या चर्चेत सरकारने शेतकर्‍यांना कायद्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली. मात्र कायदा मागे घेणे ही खूप मोठी प्रक्रिया असल्याचे सांगितल्याचे तोमर म्हणाले.
शेतकर्‍यांसोबत काल झालेल्या चर्चेत कृषिमंत्री तोमर यांच्यासोबत रेल्वेमंत्री पूीयूष गोयल, वाणिज्य राज्यमंत्री सोमप्रकाश तसेच शेतकर्‍यांच्या ४१ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.