पर्वरी महामार्गावर दिवसभर वाहतूक कोंडी

0
78

>> पोलीस हतबल, कर्मचारी उशिरा कामावर पोचले

 

पणजी- म्हापसा महामार्गावर काल अचानक वाहनांची वर्दळ वाढल्याने आणि मांडवी पुलाच्या पर्वरी भागातील काम सुरु असल्याने वाहनांची कोंडी झाल्याचे दृश्य दिवसभर दिसत होते. सकाळपासून म्हापसा, गिरी, हॉली फॅमिली ते मांडवी पुलापर्यंत वाहनांची भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
पर्वरी पोलीस स्थानकाशी यासंदर्भात चौकशी केली असता दसरा सणाची सुटी असल्याने परराज्यातून मोठ्या संख्येने वाहने राज्यात आली असून मार्गावर वाहनांची गर्दी झाली असून त्यात गोव्यातील वाहनांची भर पडली होती. शिवाय मांडवी पुलाचे काम याच मार्गावर अनेक ठिकाणी चालल्यामुळेही या कोंडीत अधिक भर पडली असल्याचे पोलिसांनी सांगितले. वाहनांच्या कोंडीवर नियंत्रण ठेवण्यास पोलिसही असमर्थ झाल्याचे दृश्य दिसत होते. महामार्गावरील वाहनांच्या कोंडीमुळे अनेक वाहनचालकांनी आपली वाहने पर्वरीतील अंतर्गत रस्त्यावर वळविली होती. त्यामुळे पर्वरीतील अंतर्गत मार्गावरही वाहनांची कोंडी प्रकर्षाने जाणवली. या कोंडीमुळे कर्मचारी वेळेत कामावर पोहोचू शकले नाही.
दरम्यान सोमवारी पहाटे ४.३० वाजता गुजरात प्रांतातील एक मालवाहू ट्रक रस्ता विभाजकाला धडकल्याने पहाटेपासूनच म्हापसा – पणजी महामार्गावर वाहनांची भली मोठी रांग लागली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सोमवारी गुजरात येथील मालवाहू आयशर ट्रक (क्र. जीजे-२३, एक्स-६५७६) पर्वरीतील रस्ता विभाजकाला धडकून उलटला. हा अपघात पहाटे ४.३० वाजता झाला. सुदैवाने चालक किरकोळ जखमी झाला. हवालदार डी. डी. नाईक यांनी अपघाताचा पंचनामा केला. अपघातामुळे म्हापसा-पणजी महामार्गावर सकाळी वाहनांची सुमारे तीन चार तास कोंडी झाली होती.