पर्रीकर आज बहुमत सिद्ध करणार

0
123

>> हंगामी सभापतीपदी सिद्धार्थ कुंकळकर यांची नियुक्ती ः २२ पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेल्या आदेशानुसार मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप आघाडी सरकारला बहुमत सिध्द करण्यासाठी गोवा विधानसभेचे अधिवेशन सकाळी ११ वा. होणार आहे. यावेळी त्यासाठी कामकाज हाताळण्यासाठी हंगामी सभापती म्हणून सिध्दार्थ कुंकळ्‌ळकर यांची काल नियुक्ती करण्यात येऊन संध्याकाळी एका साध्या समारंभात राजभवनवर राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी त्यांना पदाची शपथ दिली.

 

सभागृहात बहुमत सिध्द केल्यानंतर अधिवेशन दि. २२ पर्यंत तहकूब केले जाईल. दि. २३ रोजी राज्यपालांचे अभिभाषण व नंतर सभापती-उपसभापतींची निवड होईल व दि. २४ रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितले.
पर्रीकर सरकारचा मंगळवारी शपथविधी पार पडला होता. पर्रीकर यांना मगोचे तीन, गोवा फॉरवर्डचे दोन व अपक्ष तीन मिळून एकूण २२ आमदारांचा पाठिंबा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चर्चिल आलेमाव यांनीही त्यांना पाठिंबा दर्शविण्याची तयारी केली होती. बहुमत सिध्द केल्यानंतरच खातेवाटप करण्याचे पर्रीकर यांनी जाहीर केले आहे. महत्वाची खाती मिळविण्यासाठी शपथ विधी सोहळ्यापूर्वीच शर्यत सुरू झाली होती.
बहुमत सिध्द करण्यापूर्वी हंगामी सभापती सिध्दार्थ कुंकळ्‌ळकर नवनिर्वाचित सदस्यांना आमदारकीची शपथ देतील. त्यानंतर केवळ बहुमत सिध्द करण्याचेच कामकाज घेतले जाणार आहे. दरम्यान, विधानसभा परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले
आहेत.
जबाबदारी यशस्वीरीत्या
पार पाडेन : सिध्दार्थ
हंगामी सभापती म्हणून आपली निवड केल्याने आपण समाधानी असल्याचे सांगून आपल्या सोपविलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडेन, असा विश्‍वास कुंकळ्‌ळकर यांनी व्यक्त केला. बहुमत सिध्द करण्यासाठी बोलावण्यात येणार्‍या विधानसभा अधिवेशनावेळी हंगामी सभापती म्हणून विधानसभेतील ज्येष्ठ सदस्याची निवड करण्याची प्रथा आहे. मात्र भाजपने तसे न करता लोकशाहीचा खून केल्याचा आरोप अ. भा. कॉंग्रेस सरचिटणीस तथा गोवा प्रभारी दिग्विजय सिंह यांनी काल केला.

कुंकळकरांच्या सभापतीपदी
नियुक्तीला कॉंग्रेसची हरकत

हंगामी सभापतीपदी विधानसभेच्या सर्वांत ज्येष्ठ सदस्याची नेमणूक करायला हवी असा नियम असताना राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी त्याचे पालन केलेले नाही. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसचे विधीमंडळ नेते बाबू कवळेकर यांनी राज्यपालांसमोर एक याचिका सादर करून पणजीचे आमदार सिध्दार्थ कुंकळ्येकर यांची त्यांनी जी हंगामी सभापतीपदी निवड केलेली आहे ती मागे घेण्यात यावी, अशी मागणी केली असल्याचे अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सचिव गिरीश चोडणकर यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
विधानसभेवर जे सदस्य निवडून आलेले आहेत त्यांची नावे आदी तपशील असलेली एक यादी विधानसभा सचिवांनी राज्यपालांना सादर करावी लागते. त्याच्या आधारावर राज्यपाल सर्वांत ज्येष्ठ सदस्यांची हंगामी सभापती म्हणून निवड करीत असतात. तसेच विधानसभेतील आपल्या जागा घेण्यापूर्वी सदस्यांची एक यादी तयार केली जाते. या यादीच्या आधारावरच सदस्य आपली आसने ग्रहण करीत असतात, असेही चोडणकर यांनी सांगितले.
हंगामी सभापती हा निष्पक्षपाती असावा यासाठीच सर्वांत ज्येष्ठ अशा सदस्याची त्या पदी निवड करण्याची परंपरा असल्याचेही चोडणकर म्हणाले. या प्रश्‍नावरून कॉंग्रेस उद्या विश्‍वासदर्शक ठरावावर बहिष्कार घालणार आहे काय, असे पत्रकारानी विचारले असता त्याविषयी उद्याच काय तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे चोडणकर यांनी स्पष्ट केले.