मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, फ्रान्सिस डिसोझा व माथानी साल्ढाणा यांनी कोकणीतून, तर सुदिन ढवळीकर, लक्ष्मीकांत पार्सेकर व दयानंद मांद्रेकर यांनी मराठीतून शपथ घेतली. ठीक पाच वाजता सुरू झालेला हा शपथविधी सोहळा अर्ध्या तासात आटोपला.
या शपथविधी सोहळ्याचे आयोजन प्रथमच काबो राजभवनऐवजी पणजीत गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या खुल्या मैदानात करण्यात आले होते. राज्याच्या कानाकोपर्यातून त्यामुळे भाजप व मगो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. मात्र, या गर्दीमुळे कार्यक्रमाच्या व्यवस्थेचा पार बोजवारा उडाला. ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, व्यंकय्या नायडू, सुषमा स्वराज, पक्षाध्यक्ष नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, प्रकाश जावडेकर, राजीवप्रताप रूडी, शाहनवाज हुसेन, आरती मेहरा अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती असूनही सुरक्षेतही ढिलाई दिसून आली. शपथग्रहण सोहळ्यासाठी उभारलेला शामियानाही अपुरा पडला. त्यामुळे शामियान्याबाहेरही खुर्च्या घालून लोकांची सोय करण्यात आली होती, परंतु त्या खुर्च्याही अपुर्या पडल्या. कॉंग्रेसचे केपेचे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर वगळता कॉंग्रेसच्या इतर आमदारांनी शपथविधी सोहळ्यास अनुपस्थित राहणेच पसंत केले. गोवा विकास पक्षाचे नेते मिकी पाशेको मात्र हजर होते. भाजप समर्थित अपक्ष आमदारांबरोबरच, इतर अपक्ष आमदार विजय सरदेसाई, रोहन खंवटे, नरेश सावळ आदींचीही उपस्थिती होती. भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या नेत्या व माजी मुख्यमंत्री श्रीमती शशिकला काकोडकर यांच्यासह उद्योगपती, उद्योजक आदी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची सोहळ्याला उपस्थिती होती.
मंत्री म्हणून शपथग्रहण केलेल्या फ्रान्सिस डिसोझा यांनी टायसह सूट परिधान केला होता, तर सुदिन ढवळीकर भारतीय शैलीच्या कुर्त्या पायजम्यात होते. मुख्यमंत्री पर्रीकर, पार्सेकर, मांद्रेकर व माथानी यांनी मात्र साध्याच वेशात शपथग्रहण करणे पसंत केले. शपथग्रहण कार्यक्रमानंतर पर्रीकर यांनी जनतेला काही काळ संबोधित केले व नंतर ते गर्दीत मिसळले. शुभेच्छांचा वर्षाव स्वीकारीत नंतर पर्रीकर यांनी सचिवालयात जाऊन मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला.
विधानसभा अधिवेशन १९ मार्चपासून ३ दिवस
२१ मार्चला अर्थसंकल्प पमहादेव नाईक हंगामी सभापती
गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दि. १९ मार्च रोजी होणार असून दि. २१ रोजी २०१२-१३ साठीचा अर्थसंकल्प सादर करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल दिली. हे अधिवेशन तीन दिवसांचे असेल.
हंगामी सभापती म्हणून शिरोड्याचे आमदार महादेव नाईक यांची नियुक्ती केली आहे. मंत्र्यांना खातेवाटप दि. १३ रोजी केले जाईल, तर दुसर्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर होईल. पेट्रोलचा दर ११ रुपये स्वस्त करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी २ एप्रिलपासून होणार असून त्यासाठी १४० कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल उभा करावा लागेल. परंतु त्यासाठी सर्वसामान्यांना कराचा त्रास होणार नाही, असे श्री. पर्रीकर यांनी सांगितले. अर्थसंकल्पात आवश्यक त्या तरतुदी केल्या जातील असे ते म्हणाले.
मंत्र्यांनी दालने स्वीकारली
शपथविधी सोहळ्यानंतर नव्या मंत्र्यांनी सचिवालयात जाऊन आपापल्या कार्यालयांचा ताबा घेतला. माजी महसूलमंत्री जुझे फिलीप डिसोझा यांचे कार्यालय मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी, तर माजी साबांखामंत्री चर्चिल आलेमाव यांचे कार्यालय सुदिन ढवळीकर यांनी घेतले आहे. माजी शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेर्रात यांचे कार्यालय मंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी, तर माजी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे कार्यालय मंत्री माथानी साल्ढाणा यांनी घेतले आहे.
क्षणचित्रे
1) भारतीय जनता पक्षाच्या स्वबळावरील सरकारच्या या शपथग्रहण सोहळ्याच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, व्यंकय्या नायडू, सुषमा स्वराज, गोपिनाथ मुंडे, रवीशंकर प्रसाद, राजीव प्रताप रुडी, प्रकाश जावडेकर, अशा अनेकांनी खास उपस्थिती लावली होती.
2) शपथविधी सोहळ्याला जाहीर कार्यक्रमाचे स्वरूप देण्यात आल्यामुळे गोव्याच्या कानाकोपर्यातून भाजप व मगोचे कार्यकर्ते प्रचंड उत्साहाने सोहळ्यास आले होते. मात्र, या गर्दीमुळे शपथविधी सोहळ्याच्या निमंत्रितांना गैरसोय सोसावी लागली. अलोट गर्दीमुळे निमंत्रितांची सोय करताना सरकारी कर्मचार्यांची तारांबळ उडाल्याचे दिसत होते.
3) मुख्यमंत्री म्हणून शपथग्रहण करण्यापूर्वीच पर्रीकरांनी आपल्या कामाला सुरूवात केल्याचे दिसून आले. काल सकाळी पश्चिमी ग्रीडमधून गोव्याला होणारा वीजपुरवठा खंडित झाल्याचे समजल्यानंतर पर्रीकर यांनी प्रयत्न करून सकाळी नऊ वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करून घेतला. स्वतःच शपथविधीनंतर केलेल्या छोटेखानी भाषणात त्यांनी ही माहिती दिली.
4) औपचारिक शपथविधी सोहळ्यानंतर राज्यपाल निघून जाताच पर्रीकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. औपचारिक शपथविधी सोहळा सुरू असतानादेखील कार्यकर्ते घोषणाबाजी करीत होेते. गर्दीमुळे उपस्थितांची गैरसोय झाली, मात्र सर्वत्र उत्साहाचेच वातावरण होते.
5) शपथविधी सोहळ्याला केपेचे आमदार चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर वगळता एकही विरोधी सदस्य उपस्थित नव्हता. कार्यक्रमाच्या जाहीर स्वरूपामुळे उपस्थित कार्यकर्ते हुर्यो उडवतील या भीतीने अनेकांनी सोहळ्याला अनुपस्थित राहणेच पसंत केले. गोवा विकास पक्षाचे नेते मिकी पाशेको मात्र जातीने हजर होते.
6) शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री पर्रीकर, मंत्री फ्रान्सिस डिसोझा व माथानी साल्ढाणा यांनी कोकणीत, तर लक्ष्मीकांत पार्सेकर, सुदिन ढवळीकर व दयानंद मांद्रेकर यांनी मराठीतून शपथ घेतली.
7) शपथविधी सोहळा आटोपताच पर्रीकर तडक पर्वरीत विधानसभा संकुलात दाखल झाले. तेथे त्यांना औपचारिक सलामी देण्यात आली व लगेच त्यांनी आपल्या कार्यालयाचा ताबा घेतला.
8) मुख्यमंत्र्यांच्या कचेरीत त्यांनी आपल्या इच्छेनुरूप काही बदल करून घेतले आहेत. हे बदल वास्तुशास्त्रानुसार केलेले नसून आपल्या गरजा पाहून केले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
9) शपथविधी सोहळ्यानंतर पर्रीकरांनी संध्याकाळी आपल्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक पर्वरी सचिवालयात घेतली.