पर्यायी सरकार घडवून गुरूदक्षिणा देऊ : गोसुमं

0
93

भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या ज्येष्ठ नेत्यांनी गेली पाच वर्षे केलेल्या अतोनात श्रमांचा परिणाम म्हणून ‘गोवा सुरक्षा मंच’ या राजकीय पक्षाचा जन्म झाला असून २०१७च्या विधानसभा निवडणुकीत विजय प्राप्त करून शशिकला काकोडकर, सुभाष वेलिंगकर, ऍड. उदय भेंब्रे व इतर ज्येष्ठांन पर्यायी सरकारच्या रूपाने गुरुदक्षिणा देणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष आनंद शिरोडकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

भाभासुमंच्या लढ्याला राज्यातील सर्व राजकीय पक्षांपैकी मगोने सुरुवातीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे गोवा सुरक्षा मंचाने अजूनही त्यांच्यासाठी दरवाजा खुला ठेवला आहे, असे असले तरी मंचातर्फे स्थापन करण्यात येणार्‍या सरकारचा मुख्यमंत्री, मंचाचाच आमदार
असेल. तसेच प्रत्येक विषयावर मंच धोरण ठरविणार असल्याचे शिरोडकर यांनी सांगितले. राज्यात सुसंस्कार पिढी तयार करणे, मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण देणे, या बरोबरच गोमंतकीयांना भेडसावणारे सर्व प्रश्‍न सोडविण्याचे काम मंच करणार असल्याचे शिरोडकर यांनी सांगितले.
निवडणूक लढविण्यासाठी निवडलेल्या ३५ मतदारसंघापैकी ३२ मतदारसंघाच्या अध्यक्षांची निवड केल्याची माहिती त्यांनी दिली. येत्या दि. १३ रोजी पक्षाची राज्य कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. १० हजार कार्यकर्ते कामाला लागले असून पक्षाला लागणारा निधी उपलब्ध करून देण्याची अनेक समविचारी लोकांनी तयारी दर्शविली आहे. गरज भासल्यास निधीसाठी झोळी फिरविण्यासही मागे राहणार नसल्याचे शिरोडकर यांनी सांगितले.
मंचाने मगोला भाजपची साथ सोडण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती या मुदतीत मगोने भाजपची साथ न सोडल्याने आता मंच मगो मागे जाणार नसल्याचे पक्षाचे उपाध्यक्ष किरण नायक यांनी सांगितले. पक्षाच्या सर्व समित्या लवकरच स्थापन करणार असल्याची माहिती सरचिटणीस ऍड. हृदयनाथ शिरोडकर यांनी दिली. पत्रकार परिषदेस ऍड. स्वाती केरकर, महेश महांबरे व ऍड. तुषार परब उपस्थित होते.