>> व्हिसा नियमांत केंद्राकडून बदल; अनेक चार्टर्ड विमानांचे बुकिंग रद्द
मोदी सरकारने ब्रिटीश पारपत्रधारकांसाठीच्या व्हिसा नियमांत बदल घडवून आणल्याने गोव्याच्या पर्यटन हंगामावर त्याचे गंभीर आणि विपरित परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.
मोदी सरकारने बदललेल्या व्हिसा नियमांमुळे ब्रिटीश पारपत्रधारकांना विनाविलंब व्हिसा मिळण्यास अडचणी निर्माण झाल्याने त्यांना गोव्यात घेऊन येणारी चार्टर्ड विमाने रद्द करण्याची पाळी विमान कंपन्यांवर आली आहे. त्याशिवाय आता रशियन पर्यटकांना गोव्यात घेऊन येणार असलेल्या अझुर एअरलाईन्सने देखील आपली चार्टर्ड विमाने रद्द केली आहेत. अझुर एअरलाईन्स कंपनीने १३ चार्टर्ड विमानांसाठीचे बुकिंग केले होते. ही विमाने ऑक्टोबर महिन्यात गोव्यात येणार होती; मात्र आता त्यांनी आपले बुकिंग रद्द केले आहे, अशी माहिती गोवा विमानतळ संचालक धनंजय राव यांनी काल दिली.
ब्रिटनहून येणारी चार्टर्ड विमाने रद्द करण्यात आल्याने गोव्याच्या पर्यटनावर त्याचा विपरित परिणाम होण्याची भीती गोवा ट्रॅव्हल ऍण्ड टुरिझम असोसिएशनने व्यक्त केली आहे. नोव्हेंबर महिन्यात गोव्यात येणार्या अनेक चार्टर्ड विमानांसह डिसेंबरमधील काही चार्टर्ड विमानेही रद्द करण्यात आली असल्याचे ट्रॅव्हल ऍण्ड टुरिझम असोसिएशनने स्पष्ट केले आहे. ही चार्टर्ड विमाने रद्द करण्यात आली असल्याने गोव्यातील छोट्या व मध्यम हॉटेलवर त्याचा विपरित परिणाम तर होणार आहेच. शिवाय या हंगामातील एकूण पर्यटनावरही त्याचा मोठा परिणाम होण्याची भीती असोसिएशनने व्यक्त केली आहे.
गेली सुमारे दोन वर्षे कोविड महामारीमुळे गोव्याच्या पर्यटनावर कधी नव्हे, एवढा विपरित परिणाम झाला होता. कोविडमुळे लागू झालेले लॉकडाऊन व नंतर कोविडचा वाढतच गेलेला कहर यामुळे गेल्या दोन वर्षांत विदेशी पर्यटक गोव्यात येऊ शकले नव्हते. परिणामी राज्यातील पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. आता कोविड महामारी आटोक्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक गोव्यात दाखल होण्याची आशा होती; मात्र मोदी सरकारने विदेशी पर्यटकांसाठीच्या व्हिसा नियमांत केलेल्या बदलामुळे यंदाही पर्यटन हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.