पर्यटन हंगामापर्यंत मोपा विमानतळ सज्ज

0
47

>> पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांची माहिती; जीएमआर व विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांची घेतली बैठक

येत्या पर्यटन हंगामापर्यंत मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी सज्ज होईल, अशी माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी काल दिली. गोव्याच्या पर्यटन विकासात हा विमानतळ मोठी भूमिका बजावणार असल्याचे ते म्हणाले.
मोपा पठारावर मूर्त रूप घेत असलेल्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला काल पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर जीएमआर व विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांबरोबर प्रकल्पासंबंधी सविस्तर चर्चा केली.

पुढील १५ दिवसांत विमानतळ प्राधिकरण, पर्यटन खाते व जीएमआर कंपनी यांची एक संयुक्त बैठक होणार असल्याची माहिती खंवटे यांनी दिली. दरम्यान, मोपा विमानतळ सुरू झाल्यानंतरही दाबोळी विमानतळ हा नागरी उड्डाणासाठी खुला राहणार असल्याचे खंवटे यांनी स्पष्ट केले.

मोपा विमानतळासाठी ७१२८ झाडे कापण्यास परवानगी
मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जोड रस्त्यासाठी ७२१८ झाडे कापण्यास वन खात्याने परवानगी दिली आहे. या ७२१८ झाडांपैकी ३२५८ झाडे ही धारगळ येथे, २६१८ झाडे ही वारखंड येथे, तर १३४२ झाडे ही कासारवर्णे येथे आहेत.

संबंधित एजन्सीला कापलेल्या झाडांच्या बदली २१,६५४ नवी झाडे संपादन केलेल्या जागेत पावसाचे आगमन होण्यापूर्वी लावण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे उत्तर गोवा वन विभागाचे उप वनसंरक्षक संतोष फडते यांनी स्पष्ट केले आहे. धारगळ, वारखंड व कासारवर्णे येथील स्थानिक लोकांचा या वृक्षतोडीला विरोध आहे. नवी २१,६५४ एवढी झाडे वन अधिकार्‍यांची मदत घेऊन लावण्यात यावीत व ती लावल्यानंतर त्या संबंधीचा अहवाल सादर केला जावा, असा आदेशही उप वनसंरक्षक संतोष फडते यांनी दिला आहे.