पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची माहिती
केंद्राच्या भांडवली गुंतवणूक योजनेतून मंजुरी
गोव्यातील पर्यटन पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी केंद्र सरकारच्या भांडवली गुंतवणूक योजनेअंतर्गत सुमारे 400 कोटी किमतीच्या विविध प्रकल्पांना मंजुरी मिळालेली आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी पर्यटन भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल दिली.
पर्यटन खाते मान्सून पर्यटन या नवीन संकल्पनेच्या तयारी करीत आहे. राज्यातील धबधबे किंवा इतर पावसाळी ठिकाणे पर्यटकांना सुरक्षा उपाययोजना करून पर्यटकांना खुली केली जातील, असे रोहन खंवटे यांनी सांगितले.
राज्यात पावसाळ्यात धबधब्यांना भेट देण्यास पर्यटकांना बंदी केली जाणार नाही, तर वन विभाग आणि गोवा वन विकास महामंडळाच्या सहकार्याने धबधब्याच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा व्यवस्था केली जाणार आहे. सुरक्षेच्या चौकटीत राहून पावसाळी आनंद लुटण्याची संधी दिली जाणार आहे, असेही खंवटे यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन 2.0 अंतर्गत कोलवा समुद्रकिनाऱ्याचा पर्यटन सर्किट म्हणून विकास केला जाणार आहे. त्याठिकाणी फूड प्लाझा, शॉपिंग कॉम्प्लेक्स, फूटब्रिज इत्यादी सुविधांबरोबरच संपूर्ण सौंदर्यीकरण आणि पुनर्विकास केला जाणार आहे, अशी माहिती खंवटे यांनी दिली.
गोव्यात पर्यटकांना फक्त वाळू आणि समुद्रापेक्षा जास्त काही अनुभवण्याची संधी दिली पाहिजे. समुद्रकिनाऱ्यांसह सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि वारसा पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असेही खंवटे यांनी सांगितले.
पर्वरी येथील नियोजित टाऊन स्क्वेअर ही एक नवीन संकल्पना राबविली जाणार आहे. या ठिकाणी नागरिक, पर्यटकांसाठी मनोरंजनासाठी प्रकल्प उभारले जाणार आहे. गृहनिर्माण मंडळाच्या सुमारे 11 हजार चौरस मीटर जागेत हा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पावर सुमारे 120.97 कोटी रुपये खर्च केले जाणार असून, या प्रकल्पाची निविदा आणि पायाभरणी लवकरच केली जाणार आहे. टाऊन स्क्वेअर नागरिक आणि विविध कलाकारांसाठी एक व्यासपीठ असणार आहे. टाऊन स्क्वेअर एक जिवंत सांस्कृतिक केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट आहे, असेही त्यांनी सांगितले.