Home बातम्या पर्यटन क्षेत्रात टॅक्सी व्यवसाय महत्त्वाचा

पर्यटन क्षेत्रात टॅक्सी व्यवसाय महत्त्वाचा

0

आमदार संकल्प आमोणकर

ॲपच्या विरोधासाठी टॅक्सी व्यावसायिक भेटले आमदारांना

गोव्यातील पर्यटक टॅक्सी व्यावसायिकांच्या हितासाठी राज्यातील प्रत्येक लोकप्रतिनिधी तुमच्यासोबत राहणार आहे. तसेच गोव्यातील पर्यटन क्षेत्रात टॅक्सी व्यावसायिकांचा महत्वाचा वाटा असल्याने, राज्य सरकार त्यांच्या हितासाठी चांगले कार्य करणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत येथील टॅक्सी व्यावसायिकांना अवश्य सहकार्य करणार असून त्यांना न्याय देणार असल्याचा विश्वास मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी व्यक्त केला.
गोव्यातील पर्यटक टॅक्सींना ॲप लादण्यात येणार असल्याने, सर्व टॅक्सी व्यवसायिकांनी ॲपला तीव्र विरोध दर्शविला आहे. यासाठी प्रत्येक मतदारसंघातील पर्यटक टॅक्सी व्यावसायिकांनी आपल्या मागण्या मान्य कराव्या व ॲप रद्द करावा यासाठी लोकप्रतिनिधीची भेट घेण्याचे सत्र सुरू ठेवले आहे.

मुरगाव येथील मुरगावचा राजा पर्यटक टॅक्सी संघटना व अखिल गोवा पर्यटक टॅक्सी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांची भेट घेतली. यावेळी आमदार आमोणकर यांच्यासमवेत अखिल गोवा पर्यटक टॅक्सी संघटना व मुरगावचा राजा संघटनेने आपल्या मागण्या आमदारांपुढे ठेवल्या.

यावेळी अखिल गोवा पर्यटक टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष चेतन कामत यांनी, राज्य सरकारने ॲपखाली आम्हाला जोडू नये. तसेच सरकारने आमच्यावर लादलेले नवीन नियम त्वरित रद्द करावेत अशी मागणी केली. सरकारने आम्हाला वाटाघाटीसाठी आमंत्रण दिल्यास आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत. गोव्यातील पर्यटक टॅक्सी व्यवसाय ॲपखाली आल्यास संपूर्ण टॅक्सी व्यवसाय मोठ्या आर्थिक संकटात सापडणार आहे. सरकारने टॅक्सी व्यावसायिकांच्या अडचणी समजाव्यात व आम्हाला ॲपसारख्या नियमातून काढावे, अशी मागणी कामत यांनी केली.

गोव्यातील पारंपरिक मासळी व्यवसायाएवढाच पर्यटक टॅक्सी व्यवसाय असून, तो टिकवून ठेवण्यासाठी मी अवश्य पुढाकार घेणार असल्याचे आमदार आमोणकर यांनी सांगितले. राज्यातील टॅक्सी व्यवसाय सांभाळण्यासाठी राज्य सरकार अवश्य प्रयत्न करणार असल्याचे आमदार आमोणकर यांनी शेवटी सांगितले. यावेळी टॅक्सी व्यावसायिक गंगाराम फडते, रोहन कांदोळकर यांनी आपल्या मागण्या आमदारांसमोर ठेवल्या.

आमदार साळकरांचीही घेतली भेट
गोव्यातील पर्यटक टॅक्सी व्यवसायिकांच्या समस्येवर मुख्यमंत्री अवश्य योग्य तोडगा काढतील असा विश्वास वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी व्यक्त केला.
काल गुरुवार (दि.12) रोजी वास्को टुरिस्ट टॅक्सी संघटना व अखिल गोवा पर्यटक टॅक्सी संघटनेने आमदार साळकर यांची भेट घेऊन आपल्या समस्या त्याच्या समोर मांडल्या. यावेळी आमदार साळकर यांनी त्यांना पाठिंबा दर्शवून सर्वती मदत करणार असे सांगितले. यावेळी आमदार साळकर यांनी पाठिंब्याचे आश्वासन दिले.