राज्यातील एक प्रमुख उद्योग असलेल्या पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी गोवा सरकारने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे एका खास निधीची मागणी केली असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका राष्ट्रीय वाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून स्पष्ट केले आहे.
वरील प्रकरणी आपण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना एक वेगळे पत्र लिहिले असल्याचे सावंत यांनी सदर मुलाखतीतून बोलताना स्पष्ट केले. गोव्याची अर्थव्यवस्था ही खाण, पर्यटन, उद्योग व शेती यावर अवलंबून आहे. गेल्या वर्षी आलेल्या महामारीमुळे राज्यातील पर्यटन उद्योगावर गंभीर परिणाम झालेला असून त्यामुळे राज्य सरकारला पर्यटनातून मिळणारा महसूल पूर्णपणे बुडाला असल्याचे आपण सीतारमण यांना लिहिलेल्या पत्राद्वारे कळवले असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर पर्यटनाला चालना देण्यासाठी व विशेष करून ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी गोव्याला विशेष निधी देण्याची सोय केली जावी, अशी मागणी आपण अर्थमंत्र्यांकडे केली असल्याचे सावंत यांनी मुलाखतीतून स्पष्ट केले आहे.
गोव्याला भेट दिलेल्या १५ व्या वित्त आयोगानेही सरकार करीत असलेला विकास लक्षात घेऊन राज्याला विशेष निधीचे आश्वासन दिले असल्याचे सावंत यांनी सांगितले.