मुख्यमंत्री व जलसंसाधनमंत्र्यांनी म्हादईप्रश्‍नी राजीनामा द्यावा

0
106

>> आमदार सुदिन ढवळीकर यांची मागणी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व जलसंसाधनमंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्ज यांनी म्हादईप्रश्‍नी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी काल मगो पक्षाचे नेते, आमदार सुदिन ढवळीकर यांनी मागणी केली.

म्हादईप्रश्‍नी आपण गेल्या काही महिन्यांपासून जी भीती व्यक्त करीत होतो ती आता खरी ठरल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी आता म्हादईप्रश्‍नी ज्येष्ठ वकील अरविंद दातार यांना दोष देऊ नये, असे ढवळीकर म्हणाले.
गोव्यातील भाजप सरकारने म्हादईचा दौरा केला असून त्यांनी गोव्याची जीवनदायीनी असलेली म्हादई नदी केंद्र व कर्नाटकला विकल्याचा आरोप काल ढवळीकर यांनी केला. म्हादई नदी संपवण्याचा कट रचला जात असल्याचा जो आरोप आपण केला होता तो खरा ठरल्याचे ढवळीकर म्हणाले. मुख्यमंत्री सावंत व प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे आता उगीच नाटक करीत असून त्यांनी ज्येष्ठ वकील अरविंद दातार यांच्यावर आरोप करणे बंद करावे, असे ढवळीकर म्हणाले.

आपण यापूर्वीच सरकारच्या या भूमिकेमुळे म्हादई गोव्याच्या हातून निसटणार असल्याचे स्पष्ट केले होते. म्हादईप्रश्‍नी लवादाने जो निकाल दिला होता तो अधिसूचित करण्यास हरकत घेऊ नये, असे निर्देश गोवा सरकारनेच आपणास दिल्याचे सर्वोच्च न्यायालयात गोव्याचे बाजू मांडणारे वकील अरविंद दातार यांनी स्पष्ट केल्याचे ढवळीकर म्हणाले.