पर्यटनमंत्र्यांनी आमदारांकडून जाणून घेतल्या समुद्रकिनार्‍यांवरील समस्या

0
15

राज्यांचे सर्वंकष समुद्रकिनारा व्यवस्थापन धोरण, पर्यटक सुरक्षा या विषयांवर किनारी भागातील आमदारांसोबत झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली. आमदारांकडून किनार्‍यांवरील समस्या व इतर गोष्टी जाणून घेण्यात आल्या. पर्यटन खात्याचे अधिकारी व अभियंते किनार्‍यांना भेटी देऊन समस्यांची पाहणी करणार आहेत, असेही मंत्री खंवटे यांनी सांगितले.

कालच्या बैठकीत राज्यात दर्जेदार पर्यटकांची संख्या वाढविण्यावर विचारविनिमय करण्यात आला. समुद्र किनार्‍यांची स्वच्छता, सीसीटीव्ही कॅमेरे, नियंत्रण कक्ष आदी विषयांवरही चर्चा करण्यात आली. किनार्‍यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत; परंतु त्यांची संख्या कमी आहे.

किनार्‍यांवरील गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस अधिकार्‍यांशी बैठक घेऊन चर्चा केली जाणार आहे, असेही खंवटे यांनी सांगितले. राज्यातील पर्यटन क्षेत्र अधिक मजबूत करण्यासाठी आमदारांच्या सूचना जाणून घेण्यात आल्या, असेही मंत्री खंवटे यांनी सांगितले.