कांपाल-पणजी येथील कॅसिनो कर्निव्हलमध्ये गुरुवारी पहाटे 3.10 च्या सुमारास एका पर्यटकाने सुरक्षारक्षकांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्यात एका सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला, तर एक सुरक्षारक्षक जखमी झाला. येथील पोलिसांनी तातडीने तपासकाम करून पळून जाणाऱ्या त्या पर्यटकाला दाबोळी विमानतळाकडे जात असताना ताब्यात घेण्यात यश मिळविले. अब्दुल अल्ताफ (25 वर्षे, रा. हैदराबाद) असे संशयिताचे नाव आहे.
त्याची हैदराबाद येथील माईलार्डेवपल्ली पोलीस स्थानकात ‘हिस्टरी शीटर’ म्हणून नोंद आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.
संशयित आरोपीने जिन्यावर ठेवलेल्या लाकडी काठीच्या साहाय्याने सुरक्षारक्षकांवर प्राणघातक हल्ला केला. त्यात काठीच्या ठोकाला असलेल्या लोखंडी क्लॅम्पमुळे सुरक्षारक्षक धीरू शर्मा (33 वर्षे, मूळ रा. सतना मध्यप्रदेश) याला गंभीर दुखापत झाली होती. बांबोळी येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये नेत असताना त्याचे वाटेत निधन झाले, तर सुरक्षारक्षक सत्यम सुभाष गावकर (27, रा. शिरोडा-गोवा) याच्या डोक्यालाही दुखापत झाली असून, त्याच्यावर बांबोळी येथील गोमेकॉमध्ये उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर संशयित आरोपीने पलायन केले. पणजी पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी विविध भागात पथके पाठविली होती. तो दाबोळी विमानतळाकडे जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.