परी या सम हा…

0
122
  • जनार्दन वेर्लेकर

३१ जुलै २०२१ रोजी जयंत पवारांनी व्हॉट्‌सऍपवरून मला आश्‍वस्त केलं ‘खूप आभार वेर्लेकर! बरं वाटलं’ माझ्या आवडत्या लेखकाशी मी माझ्या परीने हृदयसंवाद साधला तो अखेरचा ठरेल हे तो वाचतानातरी माझ्या कल्पनेपल्याड होतं. आपल्या आवडत्या माणसाचं कायम असणं आपण किती सहजपणे (खरे तर बेसावधपणे) गृहीत धरून चालत असतो हे वेळ येताच कळतं.

एकाच जन्मात अनंत मरणे जगलेला – भोगलेला एक लेखक – जयंत पवार. आपल्या करुणामय जीवनदृष्टीने टीपकागदासारखा तळागाळातल्या शोषित, वंचित, विस्थापित माणसांचा भोगवटा तो एकाच वेळी धारदार तरीही अंतरीच्या ओलाव्याने ओथंबलेल्या लेखणीने टिपतो. माझ्या पांढरपेशा, मध्यमवर्गीय जाणिवांच्या फुग्याला अलगद टाचणी लावतो. असा लेखक आणि निखळ साधा माणूस वयाच्या ६१ व्या वर्षी दुर्धर आजाराने अकाली गेल्याचं दुःख उगाळण्यापेक्षा अनंताच्या वाटेवरचा हा मुशाफीर भाग्यवशात माझ्या वाट्याला आला हे समाधान उर्वरित आयुष्यभर पुरणारं आहे. ‘जन हे सुखाचे | दिल्याघेतल्याचे | अंतकाळचे कोणी नाही ॥ हे त्रिकालाबाधित सत्य त्याला गवसलं होतं आणि ते त्याने हलाहलासारखं पचवलंही होतं. त्यातून निघालेलं नवनीत अनमोल आहे.
जयंत पवार या माझ्या अतिशय आवडत्या लेखकाला मी आदरार्थी- ‘अहो जाहो’च्या भाषेत संबोधत नाही एवढा तो माझ्या जाणिवेच्या-नेणिवेच्या विश्वात जखडला गेला आहे. ही जवळीक- घनिष्ठता माझ्या बाजूने अधिक – बर्‍यापैकी एकतर्फी- दुतर्फा नाही याची अर्थातच मला जाणीव आहे. माझ्यापुरता या नात्यात- मैत्रभावात त्यामुळे कोणताही फरक पडत नाही. कोरोनाच्या जागतिक प्रकोपामुळे सक्तीचा एकटेपणा कधी नव्हे तो वाट्याला आला होता. सरलेल्या वर्षाच्या दिवाळी अंकातून निवांतपणे या लेखकाला भिडताना ‘भेटीलागी जीवा’ अशी माझी गत झाली होती. अंतकाळ (पद्मगंधा), मरणाच्या गोष्टी (वसा), जे-ते कालाचे ठायी (अक्षर) या कथांनी मनाचा कबजा घेतला होता. तुझ्या नावाने तुझीच रे पंढरी (पुढारी) या आत्मपर लेखाने माझ्या मनात घर केलं होतं. आत्मपर लेखन कटाक्षाने टाळणार्‍या या लेखकाने आपल्या दाजींवर – वडिलांवर आत्मीयतेने – अंतरीच्या जिव्हाळ्याने लिहिले होते. माझ्या वाचनानंदाची पोचपावती द्यायला मी आसुसलो होतो. क्वचितच मी त्याच्याशी सुखसंवाद साधला होता. अशी घसट मलाच आवडायची नाही. मात्र यावेळी त्याला साद घालायचा मोह मला आवरता आला नाही. उत्सुकतेने मोबाईलवर त्याच्या प्रतिसादासाठी खोळंबून राहिलो. मोबाईल बहुधा त्याच्या पत्नीने घेतल्याची खूणगाठ मनात बांधली. कयास खरा निघाला. मी माझी ओळख सांगितली. दिवाळी अंकांची नावे- कथा- लेख वाचल्याचं – आवडल्याचं एका दमात सांगून त्यांच्या प्रतिसादासाठी आसुसलो. सौ. संध्या नरे – पवार लेखकाच्या पत्नी. या संभाषणाच्या वेळी मला ते माहीत नव्हतं. ‘ते आजारी आहेत. मी त्यांना तुमची दाद कळवीन. मनापासून आभार’. जुजबी बोलणं झालं ते एवढंच. तसा मीही बर्‍यापैकी मुखदुर्बळ. नंतर मनात काळजी दाटून राहिली.
लेखक आजारग्रस्त आहे याची मला कल्पना होती. ओळखीच्या लेखक मित्रांकडून ते मला समजलं होतं. अशातच आमच्या संस्थेच्या वाचनालयातून युगवाणी या त्रैमासिकाचे दोन अंक हाती आले. खरे तर कोरोनामुळे प्रदीर्घ काळ वाचनालय बंदच होते. एक अंक चाळताना एका पानावर माझी नजर खिळली. ‘हे अधांतरत्व माझ्या नेणिवेत जाऊन बसलं असेल…’ रवींद्र लाखे यांनी जयंत पवार यांच्या घेतलेल्या प्रदीर्घ मुलाखतीचा हा मौलिक ऐवज होता. ‘अधांतर’ हे लेखकाचे गाजलेले नाटक. रवींद्र लाखे यांची माझी गाठभेट पहिल्यांदा आमच्या संस्थेतच जुळून आली होती. आमच्या संस्थेच्या पंचमवेद या नाट्यमहोत्सवात कविवर्य पु. शि. रेगे यांच्या ‘सावित्री’ या कादंबरीचं त्यांनी दिग्दर्शित केलेलं एकपात्री नाट्यरुपांतर सादर करण्याच्या निमित्ताने ते गोव्यात आले होते. त्यांनी दिग्दर्शित केलेली श्याम मनोहर या अनवट नाटककाराची ‘दर्शन’ आणि ‘सन्मान हौस’ ही नाटकेही मी अतीव कुतूहलाने पाहिली होती. आणि ही मुलाखत म्हणजे प्रायोगिक – समांतर रंगभूमीवर अविचल निष्ठेने वावरणार्‍या दोन रंगधर्मींचा मुक्त हृदयसंवाद होता. मुंबईच्या गिरणगावात भावी नाटककाराच्या मनावर त्याच्या कोवळ्या शाळकरी वयात झालेले नाट्यसंस्कार इथपासून या मुलाखतीचा सुर लागलेला होता आणि उत्तरोत्तर शब्दाशब्दांतून एका संवेदनशील मनाची जडणघडण कशी झाली आणि कौटुंबिक नाट्यवेडातून नाटक या वस्तूशी लेखकाचा जैव संबंध कसा आला याची अभ्यासपूर्ण आणि गंभीर चर्चा या मुलाखतीतून वाचकांना पहिल्यांदाच वाचायला मिळाली, ती विलक्षण उद्बोधक, प्रबोधनपर आणि नाटककाराच्या अंतरंगाचा ठाव घेणारी होती.
मुलाखत वाचून मी सर्वप्रथम रवींद्र लाखे यांना मोबाइलवर गाठलं आणि त्यांना मनापासून दाद दिली. मात्र एवढ्याने माझं समाधान झालं नव्हतं. मला पुन्हा एकदा आवडत्या लेखकाला या मुलाखतीच्या रूपाने अलीबाबाची गुहा उघडल्याची आनंदवार्ता कळवायच्या ध्यासाने उचल खाल्ली होती. मला समाजमाध्यमांवर उठसुठ संदेशांची देवाणघेवाण करायला आवडत नाही. हॅलो!, ‘सुप्रभात’, ‘हार्दिक शुभेच्छा!’ हे यंत्रवत् संदेश मला उथळ, उठवळ वाटतात. अशा यांत्रिक खेळण्यांनी आवडत्या माणसांना छळावं, त्यांचा पिच्छा पुरवावा हे मनाला पटत नाही. अभिरुचीला मानवत नाही. आणि तरीही वॉट्‌सऍपवर या लेखकाचा वावर आहे का याची मी चाचपणी केलीच. अनपेक्षितपणे ज्या मोबाइलवरून मी त्याला साद घातली होती तोच लेखकाचा व्हॉट्‌सऍप नंबर निघाला. ३० जुलै २०२१ रोजी संध्याकाळी मी त्यांना संदेश पाठवला – ‘युगवाणी त्रैमासिकाच्या अंकात रवींद्र लाखे यांनी घेतलेली तुमची प्रदीर्घ मुलाखत वाचली’. त्यांचं मनापासून अभिनंदन केलं. मुलाखतीचा दुसरा भाग अपूर्ण राहिल्याचं त्यांच्याकडून कळलं. ‘तुमच्या दिवाळी (२०२०) अंकामधील कथा, लेख वाचून कधी सुन्न तर कधी हेलावून गेलो. तुम्ही ज्यांना ज्यांना खूप आवडता त्यांच्यातला मी एक. लवकर बरे व्हा!’
३१ जुलै २०२१ रोजी त्यांनी व्हॉट्‌सऍपवरून मला आश्‍वस्त केलं ‘खूप आभार वेर्लेकर! बरं वाटलं’ माझ्या आवडत्या लेखकाशी मी माझ्या परीने हृदयसंवाद साधला. तो अखेरचा ठरेल हे तो वाचताना तरी माझ्या कल्पनेपल्याड होतं. आपल्या आवडत्या माणसाचं कायम असणं आपण किती सहजपणे (खरे तर बेसावधपणे) गृहीत धरून चालत असतो हे वेळ येताच कळतं. ती वेळ यायला टपली होती ही पश्चात्‌बुद्धी!
आमच्या गोमंत विद्या निकेतन या संस्थेच्या १६व्या विचारवेध व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी त्यांना निमंत्रण देताना मी अक्षरशः मोहरलो होतो. २०१६ या वर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संस्थेच्या निमंत्रणाला मान देऊन ते गोव्यात आले. डॉ. अंजली कीर्तने, कवी इंद्रजित भालेराव, चित्रकार सुहास बहुलकर आणि राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आजचे आघाडीचे तरुण व्यंगचित्रकार सतीश आचार्य हे त्या व्याख्यानमालेचे अन्य निमंत्रित वक्ते होते. व्याख्यानमालेचं उद्घाटन तर जयंत पवार यांच्या हस्ते झालंच. शिवाय पहिल्या दिवसापासून सुरू झालेल्या सतीश आचार्य यांच्या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटनही त्यांच्याच हस्ते करण्याची संधी संस्थेला मिळाली, या योगायोगाचं मनाला सार्थक वाटलं. दोघेही आपापल्या कलाक्षेत्रात अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे खंदे शिलेदार. एकमेकांची गुणवत्ता जाणून असलेले आणि लोकशाही शासनप्रणालीत सत्ताधार्‍यांना जाब विचारण्यास न कचरणारे.
अतुल पेठे हा प्रयोगशील रंगधर्मी निरंतर चाकोरी भेदून रंगभूमीच्या कक्षा कशा विस्तारता येतील या निदिध्यासाने पछाडलेला. रवींद्र लाखे, जयंत पवार यांच्याच जातकुळीतला. ‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य’ ही पवारांची दीर्घकथा. तिचं एकल अभिवाचन करीत तो सुसाट निघाला तो थेट कणकवली येथे येऊन थडकला. तिथून स्वारीने आमच्या संस्थेशी संधान साधलं. तो आणि त्याचे दोन तांत्रिक सहकारी मानधनाचे सोपस्कार ठरले आणि त्याच्या भन्नाट एकलनाट्याचा प्रयोग आमच्या संस्थेत अफलातून रंगला. या प्रयोगापूर्वी ही आनंदवार्ता कथाकार पवार यांना मोबाईलवरून कथन करायला मी विसरलो नाही.
एकांकिकांचे लेखन करीत अगदी कोवळ्या वयात या लेखकाचे रंगभूमीशी मैत्र जुळले. त्याचे वडील हौशी रंगभूमीवर गणेशोत्सवाच्या उत्सवात नायकाच्या भूमिका साकारायचे. मामा वरेरकरांच्या सत्तेचे गुलाम, हाच मुलाचा बाप.. या समस्याप्रधान सामाजिक नाटकांचे ते नायक. यावरून त्यांच्या अभिरुचीची कल्पना करता येते. कारण त्या काळात मुख्यत्वेकरून ऐतिहासिक, पौराणिक नाटकांचा विशेष बोलबाला असायचा. सुरुवातीला लोकनाट्यांतून आणि नंतर व्यावसायिक रंगभूमीवरून गाजलेले प्रसिद्ध नट सुहास भालेकर हे पवारांचे मामा. एकदा एक छोटे प्रहसन लिहून त्याने ते आपल्या वडिलांना दाखवले. त्यांनी ते वाचले. प्रहसन विनोदी होते. वडिलांनी विचारले – हे कोणी लिहिले आहे? क्षणभर बालनाटककार गडबडला. मग लगेच सावरून उत्तरला- ‘श्याम फडके’. ‘तरीच’, वडिलांच्या चेहर्‍यावर आश्‍चर्याचे भाव उमटले. श्याम फडके हे त्या काळी नाटककार म्हणून सुविख्यात होते.
विजय तेंडुलकर यांच्यामुळे पवारांना पत्रकारितेचे दालन खुले झाले. चंदेरी, नवशक्ती, आपलं महानगर, सांज लोकसत्ता, लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स अशी त्यांच्या पत्रकारितेची कारकीर्द बहरली. नाटककार म्हणून तेंडुलकरांचा त्यांच्यावर प्रभाव असला आणि उमेदवारीच्या काळात जरी त्यांनी या तरुणाच्या कलागुणांची निगराणी केली तरी नाटककार म्हणून त्यांनी कुणाचंच अनुकरण केलं नाही हे विशेष. त्यांना मोहन राकेश यांच्यासारख्या एकांकिका- नाटके लिहावीशी वाटत असे त्यांनी आपल्या मुलाखतीत नमूद केले आहे. बादल सरकार यांचे ‘जुलुस’ आणि लुईजी पिरांदेल्लो यांचं ‘नाटककाराच्या शोधात सहा पात्रे’ यांच्या नाट्यप्रयोगांनी थरारून गेल्याचं ते सांगतात. हबीब तन्वीर, रतन थिय्याम यांच्या नाटकांनी त्यांना प्रभावित केलं. त्यांच्या गाजलेल्या ‘अधांतर’ या नाटकाच्या संहितेचे लेखन- पुनर्लेखन सहा-सात वर्षे ते करीत होते. कारण काळ बदलत होता आणि बदलत्या काळाशी संधान साधणे हा यक्षप्रश्‍न त्यांच्यासमोर होता. शफाअत खान, चं. प्र. देशपांडे, चिं. त्र्यं. खानोलकर, महेश एलकुंचवार, श्याम मनोहर या सहप्रवासी नाटककारांबद्दल पवारांना आदर आहे तो मुलाखतीतून व्यक्त होतो. रत्नाकर मतकरी यांचंही योगदान त्यांना महत्त्वाचं वाटतं. सतत न्यूनगंडाने पछाडलेलं बालपण, संवाद साधायची भीती, एकट्यानेच बॅट-बॉलने क्रिकेट खेळणे, एकट्यानेच निरुद्देश्य भटकणे, एकट्यानेच नाटके- सिनेमे पाहणे यातून भोवतालापासून फटकून राहण्याची वृत्ती बळावली असे ते सांगतात. यातूनच स्वतःशीच संवाद करायची सवय त्यांना जडली. ‘माझे अबोलणे हे विपरीत होत आहे’ ही जाणीव तीव्र झाल्यावर त्यांच्यात नाट्यबीज अंकुरले असेल काय? मला हा प्रश्‍न त्यांना विचारायला आवडला असता. आता ते शक्य नाही.
एकांकिका – नाटक हा मुळातच नाटककार आणि दिग्दर्शक यांच्या सर्जनशीलतेची कसोटी पाहणारा कलाविष्कार. तो रंगभूमीवर सगुण- साकार होण्यातच त्याची सार्थकता- मोक्षप्राप्ती. एकवेळ तो वाचनीय नसेलही. तो प्रेक्षणीय मात्र हवाच. कदाचित याच कारणामुळे वाचक म्हणून तो सर्वस्वाने मनाला भिडत नाही. संहितावाचनात आळस आड येत असावा, हा माझा अनुभव. मी चुकतही असेन.
हीच जाणीव प्रबळ होत गेल्यामुळे एक सशक्त – समर्थ – सकस कथालेखक या लेखकाच्या रूपाने मराठी साहित्यविश्वाला लाभला हे विधान मी धारिष्ट्याने करीत आहे. कारण या लेखकाच्या कथांचे गारूड माझ्यावर आहे. ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर (२०१०)’. ‘वरनभात लोन्चा नि कोन नाय कोंचा (२०१५)’ या कथासंग्रहांच्या वाचनाने मी अंतर्बाह्य हादरलो आहे. ‘मोरी नींद नसानी होय!’ हा त्यांचा तिसरा कथासंग्रह लोकवाङ्‌मयगृहातर्फे प्रकाशित होणार आहे.
त्यांच्या कथालेखनावर आणि कथात्म साहित्यावर रवींद्र लाखे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग युगवाणी त्रैमासिकाच्या आगामी अंकातून अपेक्षित होता. दिलखुलास गप्पांचा हा शब्दोत्सव वाचकांच्या भेटीस येण्याचा योग नव्हता ही रुखरुख कायम मनात राहणार आहे.
आपलं रोजचं जगणं ब्लॅक कॉमेडीसारखं उपहासगर्भ होत चाललं आहे, असे तुला नाही वाटत? मुलाखतीत रवींद्र लाखे यांनी विचारलेल्या प्रश्‍नावर पवार यांनी दिलेलं उत्तर मूळ शब्दात देऊन या लेखाचं मी भरतवाक्य आळवतो.
‘‘जगण्याचं सेलिब्रेशन इतक्या मोठ्या प्रमाणात करायचं की सामान्यांची दुःख, यातना, भोग हे सारं चिल्लर वाटून हास्यास्पद पातळीवर येईल, असा सध्याचा जगण्याचा पॅटर्न दिसतो. इतक्या विसंगतींनी जग भरलेलं आहे की रडणंसुद्धा मनोरंजक वाटू लागलं आहे. विपरीतता ही आहे की हे यातनामय जगणं मनोरंजनाच्या विश्वात ठेवून आपल्याला पाहावं लागतं आहे. आपण थोडं वाइड अँगलमधून या विश्वाकडे बघायला लागलो की सगळं जगणंच ब्लॅक कॉमेडी वाटायला लागतं’’.