परिस्थितीचं भान…

0
203
  •  नीना नाईक

तो सोळा वर्षांचा झाला. जाता जाता एक मजेशीर बातमी त्याने मला सांगितली. ‘‘माझे वडील आता बरे आहेत. तब्येत ठणठणीत आहे. आई अजून चार महिन्याने बाळंतपणासाठी जाईल’’…. माझा ‘आ’ या वासू बापासाठी उघडाच राहिला.

शाळा म्हणजे काही नियम आले. सर्व मुलांनी एकाच प्रकारचा गणवेश घालायला हवा.. हाही सर्वश्रुत आहे. इतके असूनही एक मुलगा आज गणवेश घालून आला नाही. त्याला गणवेश न घालण्याबाबत खोदून खोदून विचारले. पठ्ठा उत्तर द्यायला तयार नाही. चेहर्‍यावर केविलवाणे भाव बरंच काही सांगून जात होते. तरी खरं कारण तो सांगेना. वेळ भरभर धावत होता. लेक्चरच्या पंचेचाळीस मिनिटातील पाच- पाच मिनिट करत घड्याळ मात्र धावत होते. त्याला टिचर्स रूममध्ये बसवून ठेवले आणि लेक्चर सुरू झाले. वेळ संपली. परत त्या मुलाकडे मोर्चा वळवला. तेवढ्यात त्याचा मित्र माझ्याकडे धावत येताना दिसला. कानाकडे माझ्या त्याने आपले तोंड लावले आणि हळूच कुजबुजला, ‘‘मॅडम, मला काही बोलायचं आहे तुमच्याशी.’’
मी तिथेच थांबले तर त्यानेच हळूहळू बाहेर यायची वाट पाहिली. कॉरिडॉरमध्ये येताच म्हणाला, ‘‘त्याने गणवेश का घातला नाही ते मला माहिती आहे’’. मी उलटपक्षी त्यालाच धारेवर धरत विचारले, ‘‘तुला माहिती होतं तर आधी का नाही बोललास?’’ त्याने आता वेळ काढला नाही. दुसरे काही मी बोलण्याअगोदरच त्याने कथन केलं. ‘‘मॅडम, तो रोज तीन तासासाठी कुणाचीतरी काळी पँट उधार आणतो आणि शाळेत घालून येतो. आज मोठी अडचण आली. त्याच्या मित्राला लग्नाला जायचे होते. त्याच्याकडे कपडे नाहीत. त्याची पँट त्याने मागितली. लग्न सकाळचे आहे. नाईलाज झाला. तो मग होती ती फाटकी दुसर्‍या रंगाची पँट घालून आलाय. त्याची परिस्थिती हलाखीची आहे’’. मी आवंढा गिळला. डोळ्यात पाणी आलं. प्रयत्नांनी त्याला थांबवलं. त्याच्या मित्राला वर्गात बसवले आणि त्याच्याकडे गेले. मी शिकवलेला पूर्ण धडा त्याला शिकवला. दुसरे लेक्चर घ्यायचा मूडच राहिला नाही. शिवाय मला दुसरा क्लासही नव्हता.

त्याला जाणीव करून न देता, घरात कोण आहेत… पासून माहिती काढायचा प्रयत्न केला. आई आहे. वडील आजारी. ६ मुलं हा एकटा कमावता. काजू साफ करायचे व ते पॅक करायचे हे त्याचे काम. एका दुकानदाराकडे शाळा सुटल्यावर सुरू होते. आठ जणांची पालनपोषणाची जबाबदारी या चौदा वर्षांच्या मुलावर होती. शाळेत जाऊन शिकायची इच्छा जबरदस्त होती. आर्थिक बाजू सांभाळताना नाकीनऊ येत होते. डबलड्युटी करून तो काजूच्या दुकानदाराकडे चार पैसे जोडत होता. शाळेची फी भरायलाही पैसे नव्हते. त्यावेळी त्याचा मित्र उभा राहिला. त्याने त्याची फी भरली. शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. युनिफॉर्मची व्यवस्था मित्रांनीच केली. आजचा प्रसंग बाका आहे. मी हतबल झालो. विचार केला मी सांगून पाहतो.
चूक माझीच म्हणावी असं मनापासून वाटलं. मी त्याला वर्गात विचारण्याऐवजी बाहेर विचारायला हवे होते. त्याची पँट पाहून खूप वाईट वाटले. आमचा शिपाई नुकताच आला होता. त्याला सांगितले याला बाजारात घेऊन जा आणि दोन जोड शर्ट-पँट घेऊन दे. पडत्या फळाची आज्ञा – शिपाई आणि तो नकोनको म्हणत असतानाही बाजारात गेले. त्याने कपडे घेतले. जास्त कटकट न करता मिळेल ते युनिफॉर्म घेऊन तो बाथरूममध्ये जाऊन कपडे बदलून आला आणि पुढल्या लेक्चरला बसला.

शाळेत येण्यासाठी केलेला खटाटोप वाखाणण्यासारखा होता. त्याचे मनोधैर्य वाढवण्यासाठी शाळाच पुढे आली. एका डोनरने आपण पूर्णतः त्याची जबाबदारी घेत असल्याचे आश्‍वासन दिले. त्याच्या भावंडांची परवड होऊ नये ह्याचीही खबरदारी घेतली. कित्येक पुण्यात्म्यांनी त्यांना आधार दिला. खटकणारी गोष्ट एकच होती- परिस्थितीने गांजलेला असताना देवाची देणगी म्हणून इतकी मुलं जन्माला घालणे हा त्या मुलांवर अन्यायच. तो त्याचे वडील आजाराने खंगलेले असताना त्यांना हे सांगण्याची वेळ नव्हे तरी समज द्यायला हवी असं मन सांगत होते.

भराभर ते वर्ष निघून गेले. तो उत्तमरीत्या चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाला. सर्वांची काळजी त्याला आता वहायची नव्हती. इतके असूनही तो आपला काम करत होता. स्किल डेव्हलपमेंट वाढविण्यासाठी त्याने मोबाईल रिपेअरीचा कोर्स केला. हळूहळू मोबाईल दुरुस्त करणं त्याच्या हातचा खेळ झाला. त्याच्या शांत, मनमोकळ्या स्वभावाने त्याने अनेक मित्र जोडले. त्याला सर्वांनी मदत केली. आता त्याला अभ्यासाला वेळही मिळू लागला. त्याच्या शिक्षणाच्या एक एक पायर्‍या तो चढू लागला. कुणाचेतरी जीवन सार्थकी लागले याचा अभिमान सर्वांनाच वाटला. तो मध्ये मध्ये येऊन मला भेटून जात होता. इतर भावंडांची प्रगती कशी चालू आहे हे इत्थंभूत सांगत होता. तो सोळा वर्षांचा झाला. जाता जाता एक मजेशीर बातमी त्याने मला सांगितली. ‘‘माझे वडील आता बरे आहेत. तब्येत ठणठणीत आहे. आई अजून चार महिन्याने बाळंतपणासाठी जाईल’’ …. माझा ‘आ’ या वासू बापासाठी उघडाच राहिला.