परदेशातून भारतात आलेले ५३ जण बाधित

0
15

>> विमानतळांवर कोविड चाचणी

>> भारतीयांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

जगभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. परदेशातून भारतात आलेले ५३ प्रवासी कोरोनाबाधित आढळले आहेत. भारतामध्ये विमानतळांवर परदेशातून येणार्‍या प्रवाशांची रँडम कोविड चाचणी केली जात आहे. त्याशिवाय प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणीही अनिवार्य आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मात्र भारतातील सध्याची कोरोनाची परिस्थिती दिलासादायक आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, पण खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे. केंद्र सरकारकडूनही याबाबत आवश्यक खबरदारीची पावले उचलण्यात येत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली आहे.

सुमारे १,७१६ आंतरराष्ट्रीय उड्डाण करणार्‍या प्रवाशांचे निरीक्षण करण्यात आले. ही चाचणी गेल्या २४ डिसेंबरपासून देशांतील विविध विमानतळांवर सुरू करण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी काही दिवसांपूर्वी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार ही चाचणी सुरू केली आहे. चीन, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि अमेरिका यांसारख्या देशांमध्ये संसर्गाची प्रकरणे वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने ही खबरदारी घेण्यास सुरूवात केलेली आहे.

देशात ३,६५३ सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत भारतात कोरोनाचे २२६ नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ३,६५३ वर पोहोचली आहे. देशात कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून आतापर्यंत एकूण ४,४६,७८,३८४ पॉझिटिव्ह आढळले आहेत. देशात सध्या कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या कमी आहे. पण नागरिकांनी योग्य खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.