‘पदव्युत्तर वैद्यकीय’साठी 41 टक्के आरक्षण जाहीर

0
2

>> एससींना 2%, एसटींना 12%, ओबीसींना 27% आरक्षण

>> आरक्षणाबाबत अखेर राज्य सरकारने जाहीर केला निर्णय

राज्य सरकारने पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) या घटकांना आरक्षण देण्याचा निर्णय काल घेतला. या अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जातींना 2 टक्के, अनुसूचित जमातींना 12 टक्के आणि इतर मागासवर्गीयांना 27 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या या तिन्ही घटकांतील विद्यार्थ्यांना आता आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी 41 टक्के आरक्षणासंबंधीची अधिसूचना गुरुवारी काढण्यात आली. यासंबंधीचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य खात्याला मान्यतेसाठी पाठवून देण्याचा आदेश सरकारने गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनना दिला आहे.

या आरक्षणासाठीचे रोस्टर तयार करण्याची जबाबदारी समाजकल्याण खात्याकडे असेल. आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील एका तज्ज्ञ समितीने गोव्याच्या ॲडव्होकेट जनरलशी चर्चा केल्यानंतर या आरक्षणाची शिफारस केली होती.
ह्या आरक्षणाच्या प्रश्नावरून मागील काही वर्षे वाद निर्माण झाला होता. राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसींनी हे आरक्षण लागू करत नसल्याबद्दल सरकारवर टीका करतानाच हे आरक्षण लागू करावे, यासाठी त्यांच्यासाठी दबाव आणला होता.