पणजी मार्केट अखेर ४३ दिवसांनंतर खुले

0
159

येथील पणजी महानगरपालिकेच्या मुख्य मार्केटमधील दुकाने ४३ दिवसांनंतर काल खुली करण्यात आली आहेत.

केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर मार्केटमधील सर्व दुकाने बंद करण्यात आली होती. केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने सुरू करण्यास मान्यता दिल्यानंतर किराणा सामानाची विक्री करणारी काही दुकाने खुली करण्यात आली होती. तथापि, मार्केटमधील मोठ्या प्रमाणात दुकाने बंद होती.
महानगरपालिकेचे मार्केटमधील दुकाने सुरू करण्यापूर्वी साफसफाई करण्यात आली.

या मार्केटमधील खुल्या जागेत बसणार्‍या विक्रेत्यांना मार्केटच्या बाहेर पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मार्केटच्या तळमजल्यावरील विक्रेत्यांचा विभाग बंद ठेवण्यात आला आहे. मार्केटमधील विविध प्रकारच्या सामानाची विक्री दुकाने सुरू करण्यात आली आहेत. मार्केटमध्ये सामाजिक अंतराचे नियमाचे पालन करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर पालिका कर्मचार्‍याची नियुक्ती करण्यात आली आहे. मार्केटमधील दुकानात जाण्यासाठी नागरिकांना मर्यादित प्रमाणात प्रवेश दिला जात आहे.