पणजी मनपा कामगार आजपासून पुन्हा संपावर

0
94

वेतन न मिळाल्याचा निषेध
पणजी महापालिकेच्या कामगारांना पगार मिळाला नसल्याने या कामगारांनी आजपासून परत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे या कामगारांचे नेते ऍड. अजितसिंह राणे यांनी काल सांगितले.महापालिकेने या कामगारांना काल सोमवारी वेतन देण्याचे आश्‍वासन दिले होते. पण त्यांना ते मिळाले नाही. या पार्श्‍वभूमीवर आज मंगळवारी संपावर जाण्याचा तसेच पगार मिळेपर्यंत संप चालूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राणे यांनी सांगितले.
उपायुक्तांनी आश्‍वासन पाळले नाही
यासंबंधी पुढे राणे म्हणाले की, वरील प्रश्‍नी आपण काल पणजी महापालिकेचे उपायुक्त सुधीर केरकर यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी सोमवारी संध्याकाळपर्यंत कामगारांना पगार देण्यात येणार असल्याचे केरकर यांनी आपणास आश्‍वासन दिले होते. मात्र, त्यांनी ते पाळले नाही. खरे म्हणजे सो’वारपासूनच संप पुकारून महापालिकेसमोर धरणे धरण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. मात्र, सुधीर केरकर यांनी आश्‍वासन दिल्यामुळे नंतर तो बेत बदलण्यात आला. पण त्यांनी आश्‍वासन न पाळल्याने मंगळवारपासून संप पुकारून महापालिकेसमोर धरणे धरण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. या पार्श्‍वभूमीवर पणजी महापालिकेचे सुमारे ६५० कामगार आज मंगळवारपासून महापालिकेसमोर धरणे धरणार आहेत.
दरम्यान, कामगारांनी गेल्या महिन्यात जो सात दिवस संप पुकारला होता त्या दिवसांचेही वेतन कामगारांना मिळाले पाहिजे अशी मागणीही काल राणे यांनी महापौर सुरेंद्र फुर्तादो, उपमहापौर कबीर पिंटो, मखिजा उपायुक्त सुधीर केरकर आदींकडे केली. या प्रश्‍नावर महापालिका मंडळाच्या बैठकीत निर्णय होणार असल्याचे त्यांनी आपणाला सांगितल्याचे ते म्हणाले. कामगारांनी केलेला संप कायदेशीर होता. त्यामुळे त्या दिवसांचा पगार द्यावाच लागणार असल्याचे राणे यांनी सांगितले.