Home बातम्या पणजी मनपाची जुनी मार्केट इमारत पाडली जाणार; ठरावाला मंजुरी

पणजी मनपाची जुनी मार्केट इमारत पाडली जाणार; ठरावाला मंजुरी

0

पणजी महानगरपालिका मंडळाच्या (सीसीपी) नगरसेवकांच्या बैठकीत जुनी महानगरपालिका मार्केट इमारत पाडण्याचा ठराव काल मंजूर करण्यात आला.
पणजी मार्केटमधील महानगरपालिकेची जुनी इमारत धोकादायक बनली आहे. ही धोकादायक इमारती पाडण्याचा विषय गेली काही वर्षे प्रलंबित आहे. काही दिवसांपूर्वी ही इमारत वापरासाठी सुरक्षित नसल्याचे तपासणीमध्ये आढळून आले होते. त्यामुळे कुठलीही गंभीर दुर्घटना घडू नये म्हणून सदर इमारत वापरासाठी बंद करण्यात आली आहे. या इमारतीमधील व्यवसाय करणाऱ्यांना नोटिसा जारी केल्या जाणार असून, आवश्यक असल्यास संरचनात्मक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करणे यासह पाडण्यासाठी आखलेल्या अधिकृत प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे, असे महापौर रोहित मोन्सेरात यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

वारसा घरे असलेल्या फोन्टेनास आणि साओ टोमे या परिसरातील रहिवाशांना पर्यटकांचा उपद्रव सहन करावा लागत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे पर्यटकांचा स्थानिकांना उपद्रव होऊ नये म्हणून वारसा घरे असलेल्या भागात पालिका निरीक्षक आणि कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत, असेही महापौर मोन्सेरात यांनी सांगितले.