पणजी, पर्वरी येथील अपघातांत 2 महिला ठार

0
4

पणजी आणि पर्वरी येथे काल सकाळी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन महिला ठार झाल्या. पणजी बसस्थानकावर बसच्या चाकाखाली सापडून एक महिला ठार झाली, तर पर्वरीत ट्रकच्या चाकाखाली सापडून एक महिला ठार झाली.
सविस्तर माहितीनुसार, पहिल्या अपघातात काल सकाळी पणजी कदंब बसस्थानकावर खाजगी प्रवासी बस आत वळत असताना अचानक एक महिला मागच्या चाकाखाली आली. हनुमान मंदिरालगत हा अपघात घडला. चाकाखाली सापडल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. पणजी पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून तिचा मृतदेह गोमेकॉत उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला.

दुसऱ्या अपघातात पर्वरी महामार्गावरील मॉल दी गोवासमोर भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने महिला ठार झाली. पर्वरीचे पोलीस निरीक्षक राहुल परब यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे शुक्रवारी सकाळी 10 वाजता पणजी ते म्हापसा दिशेने जाणाऱ्या आयशर टिपर ट्रक (क्र. जीए-05-टी-2145) ने दुचाकीवरून (क्र. जीए-07-एडी-1083) त्याच दिशेने जाणाऱ्या जेरॉम डिसोझा (74, रा. गोवा वेल्हा) यांना धडक दिली त्यात दुचाकीवरील जेरॉम यांची पत्नी मेरी फॅनी डिसोझा (67) रस्त्यावर पडल्या आणि दुर्दैवाने ट्रकच्या चाकाखाली गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात जेरॉम डिसोझा जखमी झाले असून, त्यांना गोमेकॉमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. पर्वरी पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून ट्रकचालक महेंद्र भागो मोटे (28, रा. पिसुर्ले,सत्तरी) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध भा. दं. सं. 279, 337, 304-अ कलमाखाली गुन्हा नोंदवला आहे.