पणजीसाठी पोटनिवडणूक १३ फेब्रुवारी रोजी

0
82

उत्तर गोव्यासाठी आचारसंहिता लागू
१६ रोजी मतमोजणी
पणजी मतदारसंघात येत्या १३ फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक होणार असून १६ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर कालपासून उत्तर गोव्यात निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली.
दरम्यान, निवडणुकीसाठीची अधिसूचना १९ जानेवारी रोजी काढण्यात येईल. तसेच त्याच दिवसापासून उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात येतील. अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस २७ रोजी असा असेल तर २८ रोजी अर्जांची छाननी होईल. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ३० रोजी असेल. आचारसंहिता सर्व राजकीय पक्ष व उमेदवार लागू होणार आहे.राजधानीत आता राजकीय रणधुमाळी
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अजून केवळ सहा दिवसांचाच अवधी असला तरी मतदारसंघात निवडणुकीची वातावरण निर्मिती झालेली नाही. मात्र निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे हे चित्र बदलणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
या मतदारसंघाचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची देशाचे संरक्षणमंत्री म्हणून वर्णी लागल्यानंतर त्यांना या आमदारपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर ताबडतोब कॉंग्रेसचे सांताक्रूझचे आमदार बाबुश मोन्सेर्रात यांनी आपण पणजीसाठी निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र नंतर त्यांनी माघार घेतली. असाच प्रकार ऍड्. आयरीश रॉड्रिग्स यांनीही केला. आपण भाजप उमेदवाराविरोधात काम करणार असल्याचे त्यांनी नंतर स्पष्ट केले. या पार्श्‍वभूमीवर अलीकडेच भाजपने आपला उमेदवार म्हणून सिध्दार्थ कुंकळीकर यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर कॉंग्रेसनेही पणजीचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांना उमेदवारी बहाल केल्याचे जाहीर केले. आता निवडणूक जाहीर झाल्यामुळे येत्या काही दिवसात राजधानीत राजकीय धुमश्‍चक्री होण्याची शक्यता आहे.