पणजीत ७० तर वाळपईत ७९.८० टक्के मतदान

0
228

>> पोटनिवडणूक शांततेत

>> मतदानाच्या टक्केवारीत घसरण

>> २८ रोजी मतमोजणी

पणजी व वाळपई मतदारसंघात काल झालेल्या पोटनिवडणुकीत पणजीत ७० तर वाळपईत ७९.८० टक्के एवढे मतदान झाले. सांतइनेज येथील धक्काबुक्की व उसगाव येथील तणाव वगळता मतदान शांततेत पार पडले. पणजीत ३० मतदान केंद्रांतून १५५३७ मतदारांनी मतदान केले. वाळपईत ४६ मतदान केंद्रांतून २३०३८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पणजीत २१ क्रमांकाच्या मतदान केंद्रात सर्वाधिक म्हणजेच ८२.८४ टक्के एवढे मतदान झाले. तर मतदान क्रमांक २९ मध्ये सर्वांत कमी म्हणजे ५९.९१ टक्के एवढे मतदान झाले. वाळपईत मतदान केंद्र क्रमांक २१ मध्ये सर्वाधिक म्हणजे ९१.९१ टक्के एवढे मतदान झाले. तर मतदान केंद्र क्रमांक २ मध्ये सर्वांत कमी म्हणजे ६८.७१ टक्के एवढे मतदान झाले. पणजीत गेल्या विधानसभा निवडणुकीत ८८.६ टक्के तर वाळपईत ८६.२९ टक्के एवढे मतदान झाले होते. सोमवार दि. २८ रोजी पणजी येथे मतमोजणी होईल.
मतदान शांततेत
पणजीत सांतइनेज येथे कॉंग्रेस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेले किरकोळ स्वरुपाचे भांडण सोडल्यास दोन्ही मतदारसंघात शांततापूर्णरित्या मतदान झाले, असे पत्रकार परिषदेत बोलताना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी सांगितले. पत्रकाराशी बोलताना उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी नीला मोहनन म्हणाल्या की मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी चाचणी स्वरूपाचे मतदान केले जाते त्यावेळी तांत्रिकरित्या अयोग्य असलेली दोन इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे बदलण्यात आली. एकूण मतदान शांततापूर्णरित्या झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रवी नाईक यांच्यावर गुन्हा नोंद
वाळपई मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार असलेले आपले पुत्र रॉय नाईक यांचा प्रचार करण्यासाठी प्रचार करण्यासाठीचा काळ संपून गेल्यानंतर गाडी घेऊन वाळपई मतदारसंघात गेलेले माजी मुख्यमंत्री रवी नाईक व त्यांच्या ड्रायव्हरविरुद्ध भा. दं. सं. १८८ कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला असल्याचे उत्तर गोव्याच्या पोलीस अधिक्षक चंदन चौधरी यांनी सांगितले. रवी नाईक हे इनोव्हा कार घेऊन गेले असता त्यांना ताब्यात घेण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले. प्रचाराचा काळ संपल्यानंतर एखादा राजकीय नेता अथवा एखाद्या पक्षाचा प्रचार करणारी व्यक्ती अशा प्रकारे मतदारसंघात जाऊ शकत नाही असा आयोगाचा नियम असल्याचे त्यांनी सांगितले.
कॉंग्रेसकडून गैरप्रकार ः पर्रीकर
मतदानाला ४८ तास बाकी असताना कॉंग्रेसकडून पणजी व वाळपई मतदारसंघात गैरप्रकार घडले असल्याचा आरोप मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकार परिषदेत केला. मात्र, आपण मुख्यमंत्री असल्याने संयम बाळगल्याचे सांगून या गैरप्रकारांविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे. मात्र, आठवडाभरात कारवाई न केल्यास आपण या गैरप्रकारांविरुद्धचे पुरावे प्रसार माध्यमांसमोर ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाळपईत एका आमदाराने निवडणूक आचारसंहितेचा भंग केला असल्याचे ते म्हणाले. त्याच्याविरुद्ध आयोगाकडे तक्रार केलेली आहे. पणजीत महिला कॉंग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी मतदानाच्या दिवशी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोपही पर्रीकर यांनी केला. मतदानाला ४८ तास बाकी असताना प्रतिमा कुतिन्हो यांनी मडगावहून पणजीत येऊन फिरणे म्हणजे आचारसंहितेचा भंग असल्याचे ते म्हणाले.
वाळपईत उत्साही मतदान
वाळपई मतदारसंघात काल झालेल्या पोटनिवडणुकीत एकूण ७९.८० टक्के मतदान झाले. एकूण २३०३८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. गेल्या विधानसभेच्या तुलनेत यावेळी ६ टक्के कमी मतदान झाले आहे. पहिल्या दोन तासांत २०.४१ टक्के, चार तासांत ४०.०२ टक्के, सहा तासांत ५४.८५ टक्के, आठ तासांत ६९.०५ टक्के तर एकूण ७९.८० टक्के मतदान झाले. यावेळी मतदारांचा मतदानासाठी कमी उत्साह दिसून आला. वाळपई मतदारसंघात २८८६४ एकूण मतदार असून सुमारे पाच हजारपेक्षा जास्त मतदारांनी मतदान केले नाही. त्यामुळे वाळपई मतदारसंघात धक्कादायक निकाल अपेक्षित असून कमी मतदानामुळे कॉंग्रेस – भाजपात चुरस वाढली आहे.
वाळपई मतदारसंघात मंगळवारी रात्री घडलेला प्रकार व उसगाव – तिस्क येथे झालेली गडबड सोडल्यास मतदान शांततेत पार पाडले. मतदारांनी पहिल्या चार तासांत ४० टक्के मतदान केले. त्यानंतर मात्र मतदान कमी झाले. गणेश चतुर्थीच्या तयारीसाठी काही मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली. भाजप तसेच कॉंग्रेस उमेदवारांनी विजयाचा दावा केला असून दोन्ही उमेदवारात चुरस वाढली आहे. वेळूस, वाळपई येथील मतदान केंद्रावर काही वेळ मतदान यंत्र बंद पडल्याने मतदारांना ताटकळत उभे रहावे लागले. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांना आणण्यासाठी खाजगी वाहनांचा वापर केला जात होता. मतदान करण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी धडपड करताना दिसत होते.

चांगल्या मताधिक्क्याने विजयी होणार ः पर्रीकर
पणजी पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी मतदारांकडून आपणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आपण चांगल्या मताधिक्क्याने विजयी होणार असल्याचे मुख्यमंत्री व भाजपचे पणजी मतदारसंघातील उमेदवार मनोहर पर्रीकर यांनी काल येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. मात्र, आपले मताधिक्य नेमके किती असेल याचा अंदाज आपण बांधत नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

विजय पक्का ः विश्‍वजित
आपला विजय पक्का असल्याचे भाजपचे उमेदवार विश्‍वजित राणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. चतुर्थीमुळे मतदान कमी झाले असले तरी दहा हजारांपेक्षा जास्त मताधिक्क्याने आपण निवडून येणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी सांगितले.

कमी मतदानाचा फायदा ः रॉय
गेल्या निवडणुकीच्या तुलनेत जरी कमी मतदान झालेले असले तरी त्याचा फायदा आपणास होणार असून यावेळी वाळपईत इतिहास घडणार आहे असे कॉंग्रेसचे उमेदवार रॉय नाईक यांनी सांगितले. आपल्या उमेदवारीला उशीर झाला होता. तरी मतदारांनी आपणास पाठिंबा दिला, हे मोठेपण असून आपला विजय नक्की आहे. आपल्या विजयाने स्वार्थी राजकारण्यांना योग्य धडा मिळणार असल्याचे रॉय म्हणाले.

पर्रीकर पराभूत होणार : गिरीश
पणजीतील पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पराभव स्वीकारावा लागणार आहे. मतदारांमध्ये राग खदखदत असून आपणाला विजयी करून ते राग दाखवून देणार असल्याचे कॉंग्रेसचे पणजीचे उमेदवार गिरीश चोडणकर यांनी सांगितले. आपला विजय नक्की होणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.