पणजीत पे पार्किंगच्या नावे वाहन चालकांची लुबाडणूक

0
10

>> कंत्राटदार सोहन जुवारकर यांना मनपाची नोटीस

पणजी महानगरपालिका क्षेत्रात अधिसूचित न केलेल्या भागात पे पार्किंगच्या नावाखाली वाहन चालकांची सुरू असलेली लुबाडणूक त्वरित थांबवावी, महानगरपालिकेच्या लोगोचा टी-शर्ट, कॅप, ओळखपत्रावर लोगो व नावाचा वापर थांबवावा, अशी नोटीस पणजी महानगरपालिकेने पे पार्किंग कंत्राटदार सोहन जुवारकर याला काल पाठविली आहे.

महानगरपालिका क्षेत्रात पार्किंग शुल्क वसूल करणार्‍या ठेकेदारांच्या कर्मचार्‍यांकडून महानगरपालिकेचा लोगो असलेले टी-शर्ट, कॅप परिधान केली जात असल्याने नागरिकांमध्ये गैरसमज पसरला जात आहे. पणजी महानगरपालिका मंडळाच्या गेल्या १९ ऑक्टोबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत पे पार्किंगच्या विषयावर चर्चा करण्यात आली. पे पार्किंग कंत्राटदाराने शुल्क वसूल करण्यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांच्या विरोधात अनेक तक्रारी आहेत. महानगरपालिकेची मान्यता न घेता कंत्राटदारांच्या कर्मचार्‍यांकडून महानगरपालिकेचा लोगो असलेले टी-शर्ट, कॅप आणि ओळखपत्रांचा वापर केला जात असल्याने नागरिकांमध्ये गैरसमज पसरला जात आहे, असे बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले होते.
पार्किंगसाठी अधिसूचित न केलेल्या भागातसुद्धा पार्किंग शुल्क आकारले जात आहे. पार्किंग शुल्काला विरोध करणार्‍यांची छायाचित्रे घेऊन त्यांना धमकावण्यात येत आहे. वाहन चालकांशी ते उद्धटपणे वागत आहेत, असेही निदर्शनास आणून दिले आहे.