नागरिकांच्या तक्रारींसाठी पर्यटन खाते दक्षता ऍप सुरू करणार

0
7

>> डिसेंबरपासून कार्यान्वित ः खंवटे

पर्यटन खाते पर्यटक आणि नागरिकांच्या तक्रारी हाताळण्यासाठी येत्या डिसेंबर महिन्यात सार्वजनिक दक्षता ऍप सुरू करणार आहे. पर्यटन क्षेत्रात बेकायदा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. कायदेशीर व्यवसाय करणार्‍यांना योग्य मदत केली जाणार आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

पर्यटन खात्याचा ऍप कॉल सेंटरशी जोडला जाणार आहे. या ऍपच्या माध्यमातून पर्यटक तक्रार किंवा कुठल्याही प्रकारची मदत मागू शकतील. कॉल सेंटरच्या माध्यमातून राज्यातील नोंदणीकृत हॉटेल व इतर माहिती पर्यटकांना उपलब्ध केली जाणार आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्रात ऑन लाइन पद्धतीने व्यवसाय करणार्‍यांनी आपल्या व्यवसायाची नोंद केली पाहिजे. पर्यटकांना केवळ नोंदणीकृत व्यवसायाची माहिती दिली जाणार आहे. पर्यटन खात्याकडे ज्या हॉटेल, घरमालकांनी नोंदणी केलेली नाही. त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, असेही मंत्री खंवटे यांनी सांगितले.

आता, विदेशातील इतर देशातील नागरिकांना आकर्षित करण्यावर भर दिला जाणार आहे. ज्या देशांत पर्यटन खात्याने रोड शो आयोजित केले नाहीत. अशा देशात रोड शो आयोजित केले जाणार आहेत, असेही मंत्री खंवटे यांनी सांगितले.

पर्यटन व्यवसाय शिस्तबद्ध करणार
राज्यातील पर्यटन व्यवसाय शिस्तबद्ध करण्याकडे लक्ष दिला जात आहे. पर्यटन क्षेत्रातील बेकायदा गोष्टीवर कारवाईसाठी नवीन आदेश जारी करण्यात आला असून कारवाईचे अधिकार पोलीस यंत्रणेला देण्यात आला आहे. मिरामार येथे बेकायदा सुरू असलेल्या जलसफरींवर कारवाई करून ती बंद पाडण्यात आली आहे. जलसफरीसाठी कॅप्टन ऑफ पोर्ट, पर्यटन खात्याकडून मान्यता घेण्यात आलेली नाही. जलसफरीच्या ठिकाणी कोणत्याही सुरक्षा उपाययोजनांची व्यवस्था करण्यात आली नव्हती, असे मंत्री खंवटे यांनी सांगितले.