पणजीत आजपासून पे पार्किंग

0
63

राजधानी पणजीत आजपासून ‘पे पार्किंग’ लागू करण्यात येणार असून ज्या रस्त्यांवर पे पार्किंग लागू करण्यात येणार आहे त्या रस्त्यांच्या आसपास राहणारे पणजी शहरातील मूळ निवासी सोडल्यास अन्य सर्वांना पणजी महापालिकेने ठरवलेल्या दरांनुसार पार्किंग शुल्क भरावे लागेल. शहरातील दुकानदारांना पार्किंग शुल्कात कोणतीही सूट दिली जाणार नसून त्यांना अन्य वाहनचालकांप्रमाणेच पार्किंग शुल्क भरावे लागणार असल्याचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी काल सांगितले. पणजीतील दुकानदारांना पार्किंग शुल्कात सूट दिल्यास या पे पार्किंगला काहीही अर्थ राहणार नसल्याचे ते म्हणाले.
आज ‘सॉफ्ट ओपनिंग’- फुर्तादो
दरम्यान, आजपासून पे पार्किंग सुरू करण्यात येणार असले तरी आम्ही ‘सॉफ्ट ओपनिंग’ करणार आहोत, असे ते म्हणाले. सुरवातीचे १५ दिवस हे अभ्यासासाठीचे असतील. त्यासाठीच हे सॉफ्ट ओपनिंग असेल. शहरात जुन्या घरात अथवा इमारतीत राहणारे कित्येक मूळ निवासी पणजीकर असून त्यापैकी काही लोकांची पार्किंगची सोय नाही. या लोकांसाठी वेगळा विचार करावा लागणार आहे. अन्य काही गोष्टीही आहेत. त्याचाही विचार करावा लागेल. मात्र, शहरातील दुकानदार तसेच सरकारी कर्मचारी यांना सूट देता येणार नसल्याचे फुर्तादो यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दुचाकी गाड्यांसाठी पहिल्या चार तासांसाठी ४ रुपये तर चारचाकी गाड्यांसाठी १० रुपये असे दर असतील. दुचाकींना पुढील ८ तासांसाठी ८ रु. तर चारचाकींसाठी आवश्यक ती व्यवस्था कंत्राटदाराने केलेली असून रस्त्यांवर फलक लावण्याचे काम बर्‍याच पूर्वी करण्यात आले होते, असे फुर्दातो म्हणाले.