>> पंतप्रधानांच्या दौर्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय
यंदा पणजी शहरात फेस्ताची फेरी ८ डिसेंबरऐवजी १२ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गोव्यात आगमन होणार असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव पणजी महानगर पालिकेने हा निर्णय घेतला आहे, असे पणजीचे महापौर रोहित मोन्सेर्रात यांनी काल पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
असे असले, तरी शहरातील जे पारंपरिक विक्रेते आहेत, त्यांना ८ डिसेंबरपासून चर्च परिसरात दुकाने थाटता येतील, असेही महापौरांनी स्पष्ट केले.
राजधानीतील विविध प्रकल्पांच्या निविदा काढून काम सुरू केलेले आहे. विविध प्रकल्पांचे काम सध्या जोरात सुरू असून, ही कामे शहराच्या हितासाठी व योग्य नियोजनासाठी हाती घेण्यात आलेली आहेत. ही कामे झाली की पुढील १५ वर्षे शहरातील रस्त्यांचे पुन्हा पुन्हा खोदकाम करावे लागणार नसल्याचे महापौर म्हणाले. पणजीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांसोबत बुधवारी बैठक घेतली जाणार आहे. त्यावेळी वाहतूक कोंडी सोडवण्याबाबत उपाययोजना आखली जाईल, असेही महापौरांनी सांगितले.