गोपालकृष्ण भोबे चरित्रास महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार

0
23

>> २०२१ सालासाठीच्या स्व. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्य वाङ्‌मय पुरस्कारांची घोषणा; ३३ लेखक, साहित्यिकांचा सन्म

दै. ‘नवप्रभा’चे संपादक परेश प्रभू यांना मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ्‌मय निर्मितीसाठी २०२१ सालासाठी स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार योजनेंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा ‘सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार’ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार या नावानेही ओळखला जातो. रोख १ लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. परेश प्रभू यांच्या ‘गोपालकृष्ण भोबे चरित्र आणि साहित्य’ या पुस्तकासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हे पुस्तक गोवा मराठी अकादमीतर्फे प्रकाशित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाकडून मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ्‌मय निर्मितीसाठी स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वित आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील व राज्याबाहेरील ज्या लेखकांनी मराठी भाषेत वाङ्‌मय निर्मिती केली आहे, अशा लेखकांकडून विविध वाङ्‌मय प्रकारातील पुस्तके स्वीकारण्यात येतात. सन २०२१ च्या पुरस्कार स्पर्धेसाठी प्राप्त झालेल्या प्रवेशिकांच्या अनुषंगाने स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार जाहीर झाले.

सन २०२१ या वर्षात स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रदान करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या परीक्षण समितीच्या निकालपत्रानुसार सदर ३५ पुरस्कारांसाठी पात्र ठरविण्यात आलेल्या ३३ लेखक आणि साहित्यिकांची नावे जाहीर करण्यात आली. कवी केशवसुत पुरस्कार हबीब भंडारे यांना ‘जगणं विकणार्‍या माणसांच्या कविता’ या पुस्तकासाठी जाहीर झाला आहे. बहिणाबाई चौधरी पुरस्कार रमजान मुल्ला यांना ‘अस्वस्थ काळरात्रीचे दृष्टान्त’साठी मिळाला आहे. राम गणेश गडकरी पुरस्कार नारायण जाधव बेळगावकर यांना ‘यशोधरा’साठी घोषित झाला आहे.

न. चि. केळकर पुरस्कार वंदना बोकील कुलकर्णी यांना ‘रोहिणी निरंजनी’ या पुस्तकासाठी जाहीर झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार सुरेश भटेवरा यांना ‘शोध… नेहरू-गांधी पर्वाचा!’ या पुस्तकासाठी घोषित झाला आहे. शाहू महाराज पुरस्कार शशिकांत गिरीधर पित्रे यांना ‘जयतु शिवाजी जयतु शिवाजी’साठी जाहीर झाला आहे. महात्मा जोतीराव फुले पुरस्कार अरुण गद्रे यांना ‘उत्क्रांती : एक वैज्ञानिक अंधश्रद्धा?’साठी मिळणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार सुखदेव थोरात यांना ‘वंचितांचे वर्तमान’ साठी जाहीर झाला आहे.

बालकवी पुरस्कार विवेक उगलमुगले यांना ‘ओन्ली फॉर चिल्ड्रन’साठी घोषित झाला आहे. साने गुरुजी पुरस्कार वृषाली पाटील यांना ‘पक्षी गेले कुठे?’साठी मिळणार आहे. राजा मंगळवेढेकर पुरस्कार सुहासिनी देशपांडे यांना ‘किमयागार’साठी जाहीर झाला आहे. तसेच अन्य काही लेखक व साहित्यिकांना देखील पुरस्कार जाहीर झाले आहेत.