पणजीची पोटनिवडणूक दिल्लीबरोबरच घ्यावी : कॉंग्रेस

0
100

 अन्यथा सर्वांची मतमोजणी १६ रोजी करावी
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर गोव्यासह अन्य काही ठिकाणी पोटनिवडणुका होणे हे योग्य नसून नवी दिल्लीतील निकालांमुळे प्रभावित होऊन मतदार या पोटनिवडणुकीत मतदान करण्याची भीती प्रदेश कॉंग्रेस समितीने एका पत्राद्वारे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍याकडे व्यक्त केली आहे.नवी दिल्लीतील निकालांमुळे पणजी मतदारसंघातील मतदार प्रभावित होऊन मतदान करण्याची शक्यता गृहित धरून एक तर ही पोटनिवडणूकही नवी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीबरोबर घेण्यात यावी किंवा दिल्लीसह सर्व निवडणुकांची मतमोजणी ही १६ फेब्रुवारी रोजी करण्यात यावी अशी मागणी गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस आल्तिनो गोम्स यांनी काल एका पत्राद्वारे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍याकडे केली आहे.
दरम्यान, १४ फेब्रुवारी रोजी पणजीत कार्निव्हल महोत्सव असल्याने पणजी पोटनिवडणुकीची तारीख बदलण्यात यावी अशी मागणी कॉंग्रेसचे माजी आमदार व प्रवक्ते आग्नेल फर्नांडिस यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली. कार्निव्हल हा राज्य महोत्सव असून १४ रोजी तो पणजीत होणार असल्याने त्याच्या तयारीची धामधुम असेल. त्याचा विचार करून पणजी पोटनिवडणुकीची तारीख बदलण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.