पणजीचा जीपीपीडीएत समावेशाचा निर्णय

0
114

>> पणजीच्या नियोजन, विकासाला मिळणार चालना ः कवळेकर

नगर नियोजन खात्याचे मंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या नगर नियोजन मंडळाच्या बैठकीत राजधानी पणजी शहर उत्तर गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणातून (एनजीपीडीए) काढून त्याचा समावेश ग्रेटर पणजी पीडीएमध्ये (जीपीपीडीए) करण्याचा निर्णय घेण्यात आला. कॉंग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये गेलेले पणजी मतदारसंघाचे आमदार बाबुश मोन्सेर्रात जीपीपीडीएचे अध्यक्ष आहेत.

काल वरील निर्णयासंबंधी दै. नवप्रभाशी बोलताना नगर नियोजन मंत्री कवळेकर म्हणाले, की पणजी शहराचा ग्रेटर पणजी पीडीएत समावेश केल्याने पणजी शहराचा विकास व नियोजन याला चालना मिळणार आहे. ग्रेटर पणजी पीडीएमध्ये पणजी शहर, पणजीला जोडून असलेले ताळगाव, बांबोळी व कदंब पठार यांचा समावेश आहे. पणजी शहराबरोबरच वरील भागांचा नियोजनबद्धरित्या विकास करता यावा यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे असे कवळेकर म्हणाले.

आमदार सिल्वेरा यांचा
उघड विरोध
एनजीपीडीएतून पणजी शहर वेगळे करून त्याचा ग्रेटर पणजी पीडीएमध्ये समावेश करण्यात आल्याने आता उत्तर गोवा नियोजन व विकास प्राधीकरणामध्ये म्हापसा, कळंगुट, कांदोळी, हडफडे व पर्रा हे भाग शिल्लक राहिले असल्याचे कवळेकर यांनी माहिती देताना सांगितले. दरम्यान, पणजी शहराचा ग्रेटर पणजी पीडीएमध्ये समावेश करण्यास काही सत्ताधारी आमदारांनीही विरोध दर्शविला होता. आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी उघडपणे त्याला विरोध केला होता.

दरम्यान, गोवा नगर नियोजन कायद्यातील १६ (ब) या घटना दुरुस्तीखाली विभाग बदलासाठी खात्याकडे आलेल्या अर्जांपैकी १०७ अर्ज हातावेगळे करण्यात आल्याची माहिती कवळेकर यांनी दिली. या १०७ अर्जांपैकी ९० टक्के अर्ज हे ५०० चौ. मीटर पेक्षा छोट्या जमिनींचे होते. तर उर्वरित १० टक्के हे १ हजार चौ. मी. पेक्षा छोट्या जमिनींसाठीचे अर्ज होते. गरिब लोकांना निवासी घरे बांधताना अडचणी येऊ नयेत यासाठी अशा छोट्या आकाराच्या जमिनींसाठीचे अर्ज विभाग बदलासाठी मंजूर करणार असल्याचे आपण पावसाळी अधिवेशनात सांगितले होते, असे कवळेकर म्हणाले.

या विषयावर काहीही
बोलायचे नाही ः लोबो
दरम्यान, एनजीपीडीएचे माजी चेअरमन व मंत्री मायकल लोबो यांची पणजीचा ग्रेटर पणजी पीडीएत जो समावेश करण्यात आलेला आहे त्याविषयी प्रतिक्रिया विचारली असता आपणाला त्या विषयावर काहीही बोलायचे नसल्याचे ते म्हणाले.