पक्ष्यांचे सजग जग

0
442
  • डॉ. सोमनाथ कोमरपंत

आपल्या नव्या पिढीला परिसरातील विविध पक्ष्यांविषयीचा उत्तम प्रतीचा अनुबोधपट दाखवावा. या परिसरज्ञानामुळे वसुंधरेच्या ज्ञान-अज्ञान पैलूंचे दर्शन घडेल आणि आपल्याला आगळ्या-वेगळ्या आनंदविश्‍वात रममाण होता येईल.

निसर्ग आणि मानव यांच्यामधील नाते अबाधित ठेवण्यात पशुपक्ष्यांचे अस्तित्व अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. त्यांच्या अधिवासामुळे वातावरण सदैव चैतन्यशील राहते. प्राण्यांच्या विविध प्रकारच्या हालचाली, चित्कार यांमुळे जंगले गजबजून जातात. अरण्यातील वृक्षवेलींवर नाना प्रकारचे पक्षी विविध प्रकारचे मधुर ध्वनी निर्माण करीत असतात. पक्षिगान हा एका परीने सृष्टीतील चमत्कारच म्हणायला पाहिजे. किती विविध रंगाचे, विविध ढंगाचे पक्षी या सृष्टीत वावरतात. कितीतरी त्यांच्या प्रजाती आणि उपजाती अरण्यप्रदेशांत आढळतात. हिरवीगार सृष्टी आणि तिचा आश्रय घेणारी पक्षिसृष्टी यांमुळे पर्यावरणाची शोभा वाढलेली आहे. नाहीतर भवताल उजाड भासला असता. पक्षी आपल्या कंठजन्य नादाने वातावरण भारावून टाकत असतात. अंतराळातून त्यांची फलकारेयुक्त हालचाल सतत चालू असते. तिचादेखील मंदसर नाद आपल्या कर्णपटलावर आदळत असतो. विविध ध्वनींमुळे निर्माण झालेला त्यांचा गलका… काही विचारूच नका. ही ‘सिंफनी’ आनंददायी असते. पक्ष्यांचे नादनिनाद आवडत नाहीत असे म्हणणारा माणूस अरसिकच म्हणायला पाहिजे.

सृष्टीतील पहाट पक्षिगानाने उजाडत असते. त्यांनी गायलेली सृष्टिदेवतेची ही मंगल भूपाळीच मानायला पाहिजे. पक्ष्याचे हे गाणे ज्या दिवशी थांबेल ती घटिका सर्वविनाशाची म्हणायला हवी. सार्‍या सृष्टीचा समतोल राखण्याचे मोठे कार्य पक्षीच करत असतात. परागीकरण फुलपाखरे, मधमाशा यांच्याप्रमाणे पक्षीही करतात. फळझाडांच्या बियांचा प्रसार पक्ष्यांच्यामार्फत होतो. काही गवतांच्या बीजांचा प्रसारही पक्षी करतात. या गवतामुळे जमिनीचा ओलावा कायम राहतो. पक्षी कीटकनियंत्रणाचे कार्य करतात. ते त्रास देणार्‍या कृमी, अळ्या आणि कीटक भक्षण करतात. त्यामुळे पिकांचे व वनस्पतींचे रक्षण होते. रोगांनाही आळा बसतो. तसेच काही पक्षी झाडांच्या सालीही खातात. त्यामुळे लाकडाचे संरक्षण होते. काही मांसाहारी पक्षी उंदीर, घुशी इत्यादी कुरतडणारे प्राणी खातात. अशा प्राण्यांचा उपद्रव त्यामुळे कमी होतो.

सर्वसामान्यपणे भूचर पक्षी, जलचर पक्षी आणि निशाचर पक्षी असे पक्ष्यांचे तीन प्रकार आढळतात. भूचर पक्ष्यांपैकी कोंबडा, कोंबडी, बदके हे पक्षी पाळीव आहेत. अंडी आणि मांस यांसाठी माणूस त्यांचा उपयोग करतो. एक खेळ म्हणून पाणकोंबडी, लावा, होला, ग्राउझ, फेजंट या पक्ष्यांची शिकार केली जाते. मनोविनोदन आणि सौंदर्याविषयीचे आकर्षण यांसाठी माणसे पोपट, मैना, बुलबुल, काकाकुवा, मोर, कोकिळ, हंस आणि लव्हबर्ड इत्यादी पक्षी पाळतात. कोंबड्यांच्या झुंजी लावल्या जातात. नागा, रेड इंडियन लोक पक्ष्यांची पिसे आपल्या शिरस्राणात सौंदर्यप्रसाधन म्हणून वापरतात. बॅडमिंटनची फुले, पंखे वा कुंचे बनविण्यासाठी पिसे वापरतात. एस्किमो व पॉलिनेशियन लोक (विशेषतः स्त्रिया) वस्त्रांसाठी पिसांचा वापर करतात.

पक्षिगानाप्रमाणे पक्ष्यांनी स्वसंरक्षणासाठी बांधलेली घरटी हा मानवी कुतूहलाचा विषय झालेला आहे. पक्ष्यांना घरटे बांधण्यासाठी कमीजास्त कालावधी लागतो. ‘काडी काडी जमवून घर बांधणे’ हा वाक्प्रचार केवळ पक्ष्यांच्या बाबतीत अधिक खरा आहे. हंगामाच्या अगदी सुरुवातीला एखाद्या गायक पक्ष्याला घरटे पूर्ण बांधण्यासाठी कित्येक आठवडे लागतात; पण भर हंगामात किंवा मादीची अंडी घालण्याची वेळ अगदी जवळ आली की त्याला हे घरटे तयार करायला अवघेच दिवस लागतात. काही घरटी अत्यंत साधी असतात. ती बशीसारखी किंवा खळगा असलेल्या वाटीसारखी असतात.

टिटवीसारखा पक्षी जमीन थोडीशी उकरून चारी बाजूंना गवताच्या काड्या टाकून साध्या पद्धतीने घर बांधतो. सुगरणीचे घर मात्र परिश्रमपूर्वक आणि कौशल्यपूर्वक बांधलेले असते. उन्हापावसापासून अबाधित असे ते संरक्षक कवच असते. म्हणून बहिणाबाई चौधरींसारख्या कवयित्रीला म्हणावेसे वाटते ः
अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिल्लासाठी तिनं
झोका झाडाले टांगला

खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा देख रे मानसा!
इथेही या दांपत्याची श्रमविभागणी असते. नर घरटे बांधण्याचे काम करतो. नंतर मादी घरट्याला आतून अस्तर लावते. सुतार पक्ष्याच्या बाबतीत झाडाच्या खोडात घरट्यासाठी पोकळी तयार करण्याचे काम दोघेही मिळून करतात.

पक्ष्यांचा गानस्वर त्यांच्या उद्गाराचा वाचक असतो. हे त्याचे संदेशन असते. भयाची सूचना देणे, पीडा, क्लेश किंवा आपत्तीत सापडल्याचे सूचित करण्यासाठी हा स्वर त्यांना उपयुक्त ठरतो. चक्रवाक आणि चक्रवाकी रात्री विरहाचे आक्रंदन करतात असा संकेत आहे. शत्रूचा सामूहिकरीत्या प्रतिकार करण्यासाठी, अन्न मिळण्याची शक्यता दिसताच स्वबांधवांना कळविण्यासाठी तसेच विणीचा हंगाम व घरटी बांधणे इत्यादींची सूचना देण्यासाठी त्यांच्या विविध सादस्वरांचा उपयोग होतो. १९८० साली आपल्याकडे दिसलेल्या खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी दुपारी २.१५ वाजताच सगळीकडे अंधारून आले होते. त्यावेळी वातावरणातील पक्षी, कोंबडे कसे ध्वनी निर्माण करीत होते ते अनुभवण्यासारखे होते. यावरून पक्षी किती अतिसंवेदनशील असतात हे दिसून येते. पक्ष्यांच्या हालचाली, त्यांचे नादनिनाद, ते करीत असलेले पिल्लांचे संगोपन आणि प्रियाराधनाप्रसंगीचे त्यांचे थाटमाट यांचे बारकाईने वर्णन करायला डॉ. सलिम अली, मारुती चितमपल्ली आणि प्रकाश गोळे यांच्यासारखे तोलामोलाचे पक्षितज्ज्ञच हवेत असे वाटायला लागते. शिवाय त्यांच्या भावमुद्रा टिपायला निरंजन संतांसारखे कुशल छायाचित्रकार हवेत.

सृजनशील साहित्याची निर्मिती, चित्रकला, शिल्पकला, मूर्तिकला आणि पक्षिसृष्टी यांचा निकटचा संबंध आहे. मानवी संस्कृतीने पक्षिसृष्टीला आपले मानलेले आहे. म्हणून मौखिक परंपरेतील म्हणी, वाक्प्रचार आणि गीते यांत पक्ष्यांचे संदर्भ सर्रास येतात. अभिजात संस्कृत वाङ्‌मयात आणि देशी भाषांतील लिखित परंपरेत पक्षिसृष्टीची चित्रे वैपुल्याने येतात. कावळा, चिमणी, हंस, बगळे, मोर, पोपट, साळुंकी, कबुतर, भारद्वाज, कोकिळ, सुतारपक्षी, खंड्यापक्षी, बदक हे पक्षी आपल्या नित्य परिचयाचे. त्यांच्या सर्व प्रकारच्या हालचाली आपण निरखून पाहिलेल्या असतात. प्राचीन काव्यातील दृष्टान्तांमध्ये पक्ष्यांचे जेव्हा संदर्भ येतात तेव्हा जीवनजाणिवेच्या बाबतीत ते आपल्याला लगेच आकळतात. कारण या पक्षिसृष्टीने आपले अनुभवविश्‍व नित्य निरीक्षणाद्वारे समृद्ध केलेले असते. कोकिळेची अंडी कावळ्याच्या मादीकडून उबविली जातात. रंगसादृश्यामुळे ही प्रक्रिया घडते. यावरून कोकिळेची परभृतप्रवृत्ती कळते.

गीतार्थाच्या प्रमेयाशी झोंबी घेणारे ज्ञानदेव अत्यंत विनयशीलतेने; पण तितक्याच अदम्य आत्मप्रकटीकरणाच्या हव्यासाने मनातील भाव बोलून दाखवितात ः
पांखफुटे पाखिरूं| वुडे तरी नभींच थिरू| गगन क्रमी सत्वरू|
तो गरुडही तेथे॥
राजहंसाचें चालणें| भूतळीं जालिया शहाणें| आणिकें काय कोणें|
चालावेंचिना॥

  • नुकतेच पंख फुटलेले पाखरू आकाशात उडू शकत नाही, तरी ते तिथेच स्थिर राहते आणि सगळे आकाश आपल्या वेंघेत घेते, तो गरुडही तिथेच असतो. राजहंसाचे चालणे जगात शहाणपणाचे मानले जाते, तर आणिक काय कुणी चालूच नये?
    या उदाहरणातून केवढा अर्थपूर्ण आशय ज्ञानदेवांनी उलगडून दाखविला आहे! संत जनाबाई विठोबामाऊलीचा वात्सल्यभाव अधोरेखित करते ः
    घार हिंडते आकाशीं| चित्त तिचें पिल्लांपाशीं॥
    आपल्या भारतीय परंपरेतील ‘शुकनलिकान्याय’, ‘काकतालियन्याय’ आणि ‘नीरक्षीरविवेक’ इत्यादी संकल्पना पक्षिनिरीक्षणातूनच आलेल्या आहेत. प्रज्ञा-प्रतिभेची देवता सरस्वती हिचे वाहन ‘मयूर’ असावे, ती ‘हंसवाहिनी’ही असावी यातील प्रतीकात्म आशय आपण समजून घ्यायला पाहिजे.

‘अंडी पिल्ली माहीत असणे’, ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही’, ‘पराचा कावळा करणे’, ‘चिमणीएवढे तोंड करणे’, ‘एका पंखाने मोर होणे’ व ‘पोटात कावळे ओरडणे’ इत्यादी मोजकेच वाक्प्रचार; त्याचप्रमाणे काही म्हणी पाहिल्या तर पक्ष्यांच्या संदर्भांमुळे भाषासमृद्धी कशी होते याचा प्रत्यय येईल.

आपल्या नव्या पिढीला परिसरातील विविध पक्ष्यांविषयीचा उत्तम प्रतीचा अनुबोधपट दाखवावा. त्यात निरनिराळ्या पक्ष्यांची उत्कृष्ट छायाचित्रे, त्यांची जीवनशैली, त्यांच्या विविध लकबी यांचा समावेश असावा. या परिसरज्ञानामुळे वसुंधरेच्या ज्ञान-अज्ञान पैलूंचे दर्शन घडेल आणि आपल्याला आगळ्या-वेगळ्या आनंदविश्‍वात रममाण होता येईल.