पक्षांतरासाठी आमदारांना प्रत्येकी ३० ते ४० कोटी रुपये

0
11

>> कॉंग्रेस गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांचा पत्रकार परिषदेत आरोप

कॉंग्रेस पक्षाच्या आठ आमदारांना पक्षांतर करण्यासाठी प्रत्येकी ३० ते ४० कोटी रुपये दिल्याचा आरोप कॉंग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी कॉंग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केला.

कॉंग्रेसच्या ८ आमदारांनी स्वार्थासाठी मतदारांची फसवणूक केली आणि त्यांना ३० ते ४० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली. एक आमदार पक्षांतर करण्यासाठी तयार नसल्याने त्याला ५० कोटी रुपयांपर्यंत ऑफर देण्यात आली. कॉंग्रेसच्या काही आमदारांनी सत्ता, पैशांसाठी पक्षांतर केले आहे. तर, काही कॉंग्रेस आमदारांना धमक्या देण्यात आल्या आहेत, असाही दावा राव यांनी केला.
भाजपला देशातील विरोधी पक्ष संपवायचा आहे. त्यामुळे विरोधी पक्षाच्या आमदारांना फोडण्याचे काम जोरात सुरू आहे. विरोधी पक्षाचे आमदार फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केला जात आहे. भाजपला हा पैसा कुठून प्राप्त होतो याची ईडी व इतर संस्थांनी चौकशी केली पाहिजे. देशातील लोकशाही कायम टिकवून ठेवण्यासाठी एकजुटीची गरज आहे, असेही राव यांनी सांगितले.

मतदारांचा विश्‍वासघात
कॉंग्रेसच्या पक्षांतर केलेल्या आठ आमदारांवर कायदेशीर कारवाई करण्यावर विचारविनिमय केला जात आहे. कॉंग्रेसच्या आठ आमदारांनी मतदारांचा विश्वासघात केला आहे. त्या आमदारांनी कॉंग्रेस पक्षातून फुटणार नाही, असे प्रतिज्ञापत्रावर लिहून दिले होते. तसेच देवालय, चर्च, दर्गा येथे जाऊन शपथ घेतली होती. या आठ आमदारांनी देवालाही फसवले असल्याचे राव यांनी सांगितले.

मायकल लोबो यांना कॉंग्रेस पक्षात प्रवेश देण्याची चूक केली. लोबो यांच्याकडून कॉंग्रेसला लाभ होऊ शकतो म्हणून त्यांना कॉंग्रेस पक्षात प्रवेश देण्यात आला. गोवा विधानसभेत विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी देण्यात आली. परंतु, सरकारकडून त्यांच्या व्यवसायातील बेकायदा गोष्टींवर कारवाई सुरू करण्यात आल्याने त्यांनी सरकारकडे शरणागती पत्करून कॉंग्रेसचे आमदार फोडण्याचे काम केले. कामत आणि लोबो यांनी कॉंग्रेसचे आमदार फोडण्याचे कटकारस्थान रचले आहे, असा आरोपही राव यांनी यावेळी केला.

राज्यात कॉंग्रेसचे तीन आमदार शिल्लक आहे. तिघेही आमदार राज्यातील जनतेचे आवाज बनून कार्य करतील. कॉंग्रेसमधून फुटून गेलेल्यांना पुन्हा प्रवेश दिला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

कॉंग्रेसमधील गोंधळामुळे विधिमंडळ नेता निवडण्यास विलंब झाला. आता काही दिवसांत विधिमंडळ नेता निवडला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

कॉँग्रेसमध्ये यापुढे राजकीय नेत्यांना प्रवेश देताना गंभीरपणे विचार केला जाणार आहे. राज्यातील कॉंग्रेस पक्षाची फेरबांधणी केली जाणार आहे. तसेच, ज्या मतदारसंघातील आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्या ठिकाणी नव्याने फेररचना केली जाणार आहे, असेही राव यांनी सांगितले. यावेळी खासदार फ्रान्सिस सार्दीन, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, महिला अध्यक्ष बिना नाईक, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष ऍड. वरद म्हार्दोळकर आदींची उपस्थिती होती.