पंतप्रधान मोदींकडून कोरोना परिस्थितीचा आढावा

0
6

>> राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसमवेत आज केंद्रीयमंत्री मांडवीय घेणार बैठक

देशात झपाट्याने वाढणार्‍या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल तातडीची बैठक घेतली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या या बैठकीत देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय, कॅबिनेट सचिव राजीव गौबा, गृहसचिव अजय भल्ला, आरोग्य सचिव राजेश भूषण, आयसीएमआरचे डीजी यांच्यासह अनेक अधिकारी या बैठकीला बैठकीला उपस्थित होते.

दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय हे आज सोमवारी राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

तामिळनाडूत लॉकडाऊन
तामिळनाडूत कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने राज्यात काल रविवारपासून लॉकडाऊन सुरू झाला आहे. तामिळनाडूत गेल्या २४ तासांत कोरोनाचे १०,९८७ नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ही २७,८७,३९१ इतकी झाली आहे. तामिळनाडूमध्ये आधीपासूनच रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू होती. आता लॉकडाऊन सुरू झाल्याने राज्यात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. दूध, एटीएम, इस्पितळे, इस्पितळांशी संबंधित इतर विविध कामे, मालवाहतूक, पेट्रोल पंप इत्यादी आवश्यक सेवा सुरू आहेत. तर मेट्रो, सार्वजनिक वाहतूक बस सेवा बंद आहेत.

अनेक राज्यांत रात्रीची संचारबंदी
दरम्यान, अनेक राज्यांनी वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्बंधांमध्ये वाढ केली आहे. राजधानी दिल्लीत शुक्रवारपासून रात्री १० वाजेपासून ते सोमवारी पहाटेपर्यंत ५ वाजेपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात आजपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री ११ पासून पहाटे ५ वाजेपर्यंत हा कर्फ्यू लागू राहणार आहे. त्रिपुरा सरकारने १० जानेवारी ते २० जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत हा कर्फ्यू लागू असणार आहे. हिमाचल प्रदेशातही अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहे.

स्थलांतरित मजुरांचे गावी पलायन
कोरोनाची नवी लाट आणि ओमिक्रॉनचा वाढता संसर्ग पाहता पुन्हा एकदा निर्बंधांचा काळ सुरू झाला आहे. बदलत असलेली परिस्थिती पाहून परप्रांतीय मजूरही घाबरले असून त्यांनी आपल्या गावचा रस्ता पकडला आहे.

संसदेत ४०० कामगार कोरोनाबाधित

राजधानी दिल्लीत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. संसदेत ‘कोरोना विस्फोट’ झालेला दिसून येत असून संसदेत करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये ४०० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. राजधानीत नवीन रुग्णांची वाढ होत असल्याचे पाहून ६ व ७ जानेवारी रोजी संसदेत अचानक चाचणी घेण्यात आली. ४ ते ८ जानेवारी दरम्यान राज्यसभा सचिवालयातील ६५, लोकसभा सचिवालयातील सुमारे २०० आणि संसदेत काम करणार्‍या आणखी १३३ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी नव्याने निर्देश जारी केले आहेत.
राज्यसभा सचिवालयाने अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या उपस्थितीवर निर्बंध आणले आहेत. ताज्या सूचनांनुसार अप्पर सचिव/कार्यकारी अधिकारी पदावरील ५० टक्के अधिकारी आणि कर्मचार्‍यांना या महिन्याच्या अखेरपर्यंत घरून काम करावे लागेल. ही संख्या एकूण कर्मचार्‍यांपैकी सुमारे ६५ टक्के आहे. अपंग आणि गर्भवती महिलांना कार्यालयात येण्यापासून सूट देण्यात आली आहे. सर्व अधिकृत बैठका या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होतील. सर्व १३०० अधिकारी आणि कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी करावी, असे निर्देश राज्यसभेचे अध्यक्ष नायडू यांनी दिले आहेत.