मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती; 16 ठिकाणी सरकारच्या विविध खात्यांकडून उपक्रमांचे आयोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान राज्यात सेवा पंधरवडा साजरा केला जाणार असून, यानिमित्त राज्यभरात 16 ठिकाणी सरकारच्या विविध खात्यांकडून विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकारच्या विविध खात्यांच्या प्रमुखासोबत घेतलेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत पर्वरी येथे मंत्रालयात काल दिली.
राज्य सरकारच्या सेवा पंधरवडा उपक्रमाचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांमध्ये स्वच्छता मोहीम, आरोग्य आणि रक्तदान शिबिरे, एक पेड माँ के नाम वृक्षारोपण मोहीम, दिव्यांग व्यक्तींना पाठिंबा, नारी शक्ती, युवा शक्ती, किसान कल्याण आणि गरीब कल्याण यांचे सक्षमीकरण, तसेच स्थानिक उत्पादने आणि कारागिरांना प्रोत्साहन यांचा समावेश असणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
येत्या 17 सप्टेंबर रोजी कला अकादमीच्या आवारात या उपक्रमाचा शुभारंभ केला जाणार आहे. यावेळी ग्रामीण विकास खात्यातर्फे राज्यातील महिला स्वंयसहाय्य गटांना सरकारच्या विविध कर्ज योजनाखाली सुमारे 60 कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप केले जाणार आहे. या कार्यक्रमात राज्यभरातून सुमारे 1 हजार महिला सहभागी होणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली 12 वर्षे देशातील नागरिकांच्या विकासासाठी कार्य करीत आहे. मोदी यांनी राबविलेल्या विकासकामांची माहिती सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचविण्यात येणार आहे. राज्यातील पंधरा दिवसात पेडणे ते काणकोणपर्यंत दरदिवशी एका खात्याच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.
18 रोजी फोंडा येथे क्रीडा खात्याच्यावतीने कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. 19 सप्टेंबरला सार्वजनिक तक्रार कक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन केले जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.