पंजाबचा सामना

0
32

पंजाब विधानसभेच्या सर्व ११७ जागांसाठीचे लांबणीवर गेलेले मतदान काल पार पडले. मतदारांचा कौल मतदानयंत्रात सीलबंद झाला आहे. गोव्याप्रमाणेच पंजाबमध्येही काय घडणार याविषयी यावेळी विलक्षण उत्सुकता आहे. आजवर कॉंग्रेस आणि शिरोमणी अकाली दल यांच्यात झडणारा पारंपरिक सामना यावेळी पंचरंगी स्वरूपाचा झाला आहे. शिरोमणी दल आणि भाजपाची साथ शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ केंद्रीय मंत्री हरसिम्रत कौर यांच्या मोदी मंत्रिमंडळातील राजीनाम्याने तुटली त्यामुळे ते पक्ष वेगवेगळे मैदानात उतरले आहेत. अकाली दल यावेळी मायावतींच्या बहुजन समाज पक्षासमवेत मैदानात उतरलेला आहे. सत्ताधारी कॉंग्रेस आपला पंजाबचा बालेकिल्ला राखण्याच्या आटोकाट प्रयत्नात आहे, तर आम आदमी पक्षाने यावेळी पंजाब सर करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केलेली आहे. त्यात शेतकर्‍यांचा संयुक्त समाज मोर्चा आणि भाजप – पंजाब लोक कॉंग्रेस हेही मैदानात असल्याने ह्या बहुरंगी लढाईत कोण बाजी मारते हे पाहण्यासाठी दहा मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
पंजाबच्या राजकारणातील हा पंचरंगी सामना कॉंग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करणार की तो राखण्यास साह्यकारी ठरणार हे जरी स्पष्ट नसले तरी मुळात या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाब प्रदेश कॉंग्रेसमध्ये उफाळलेली यादवी, त्याची परिणती म्हणून अमरिंदर सिंग यांनी पक्षाला ठोकलेला रामराम, नवज्योतसिंग सिद्धू आणि मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्यातील शीतयुद्ध ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या तर कॉंग्रेससाठी ही निवडणूक अतिशय आव्हानात्मक आहे. २०१७ मध्ये कॉंग्रेसने तब्बल ६६ टक्के मते प्राप्त करून विक्रम प्रस्थापित केला होता. त्यापूर्वी फक्त १९९९ मध्ये कॉंग्रेसने तेथे ७४ टक्के मते प्राप्त केलेली होती. परंतु त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असल्याने या बदललेल्या परिस्थितीत कॉंग्रेस आपले वर्चस्व राखू शकेल का हे पाहावे लागेल.
पंजाबच्या मतदारांची एकूण रचना विचारात घेतली तर हे एक असे राज्य आहे जेथे दलित मतांचा कल हा अनेक मतदारसंघांत निर्णायक ठरत असतो. एकूण दोन कोटी ७७ लाख मतदारांपैकी तब्बल ३२ टक्के मते ही दलित समाजाची आहेत. जाट शिखांचे प्रमाण त्या खालोखाल २० टक्के आहे. दलितांमध्ये देखील पस्तीस ते चाळीस उपजाती आहेत. त्यातही पुन्हा मजहबी, रविदासिया, अस धर्मी, वाल्मिकी आदी प्रकार आहेत. त्यांच्यात पुन्हा सामाजिक उतरंड आहे. कॉंग्रेसने पंजाबची धुरा निवडणुकीच्या तोंडावर चरणजितसिंग चन्नींसारख्या एका दलित मुख्यमंत्र्याच्या हाती सोपवून या मतदारांना आपलेसे करण्याचा जोरदार प्रयत्न केलेला आहे. राज्यातील जवळजवळ नव्वद टक्के जागांवर दलित मतांचा प्रभाव निर्णायक ठरत असतो हा राजकीय इतिहास असल्याने साहजिकच ही मते प्राप्त करण्यासाठी चढाओढ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील नुकतेच दिल्लीत संत रवीदास यांच्या भजनात खंजिरी वाजवत सामील झाले त्यामागेही हेच राजकीय आडाखे होते. अनेक मतदारसंघांमध्ये वीस ते तब्बल पन्नास टक्के मते अनुसूचित जातींची असल्याने निवडणुकीवर त्यांचा प्रभाव पडत असतो. त्यातच यावेळी पंचरंगी सामना होत असल्याने ही मते निकाल इकडचे तिकडे करू शकतात.
पंजाबची सत्ता राखणे कॉंग्रेससाठी प्रतिष्ठेचे आहे. दुसरीकडे आम आदमी पक्ष पंजाबमध्ये दिल्लीच्या यशाची पुनरावृत्ती घडवण्यासाठी यावेळी फार मोठ्या प्रमाणात तेथे सक्रिय झालेला होता. शिरोमणी अकाली दलानेही मध्यंतरी राज्यात घडलेल्या शिखांच्या पवित्र धर्मग्रंथांच्या बेअदबीच्या प्रकरणांचा राजकीय फायदा उठवण्याचे जोरदार प्रयत्न चालवले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर काल राज्यात मतदान झालेले आहे.
पंजाबमध्ये काय होणार? कॉंग्रेस आपला हा पारंपरिक बालेकिल्ला राखू शकणार की आप तेथे सत्ताधारी कॉंग्रेसचा सफाया करून सत्ता हस्तगत करणार? की शिरोमणी अकाली दल – बसपचे सोशल इंजिनिअरिंग यावेळी आपली कमाल दाखवणार? की मोदींच्या प्रतिमेवर भाजप तेथे आपली कमाल दाखवून देणार? पंजाबचा शेतकरीही या निवडणुकीत सक्रियतेने उतरलेला आहे. एकूण सामना बहुरंगी असला तरी अटीतटीचा आहे आणि अर्थातच अवघ्या देशाची त्यावर नजर आहे. कॉंग्रेससाठी तर एकूण राष्ट्रीय परिप्रेक्ष्याकडे पाहता पंजाबमधली आपली सत्ता टिकवून ठेवण्याचे फार मोठे आव्हान यावेळी उभे आहे. देशातील एकेक गड ढासळत चालला असल्याने पंजाबमधील राजवटही कोसळली तर ते मानहानीकारक तर ठरेलच, परंतु राहुल गांधी यांच्या नेतृत्वशैलीवर आधीच असलेले अकार्यक्षमतेचे सावट अधिकच गडद बनेल.