युद्धस्य कथा रम्यः असे म्हणतात, परंतु त्या रम्य नसतात, तर किती भयावह असतात हे इस्रायल – गाझा युद्धातून घडोघडी दिसते आहे. गेल्या सात ऑक्टोबरपासून हमासच्या नायनाटासाठी गाझावर सतत अग्निवर्षाव करीत आलेल्या इस्रायलने आता युद्धाला निर्णायक टप्प्यात नेण्याची तयारी चालवली आहे. गेले दोन दिवस गाझावरील त्याच्या बॉम्बवर्षावातही वाढ झाल्याचे दिसून आले. एका रात्रीत हमासच्या तीनशे – चारशे ठिकाणांवर बॉम्बफेक होते ह्याचा अर्थ स्पष्ट आहे. एवढे प्रयत्न करूनही हमासचा नायनाट होत नसल्याचे दिसत असल्याने इस्रायलचा संयम आता सुटत चालला आहे. गाझाची अन्न, पाणी, औषध आणि इंधनाच्या बाबतीत पुरती कोंडी करूनही संयुक्त राष्ट्र संघटना, आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस आदी आंतरराष्ट्रीय संघटनांच्या हस्तक्षेपामुळे आणि आश्रयामुळे ही कोंडी कुचकामी ठरली. त्यामुळे आपले ओलीस सोडवून घेण्यासाठीही इस्रायलला प्रयत्नांची शर्थ करावी लागत असल्याचे दिसते. अमेरिकेने कतारच्या मध्यस्थीने आपल्या दोन नागरिकांना हमासच्या ताब्यातून सोडवून घेतले. इस्रायलचे ओलीस मात्र मृत्यूच्या जबड्यात खितपत पडले आहेत. इस्रायलने युद्ध तीव्र करताच काल दोन ज्येष्ठ महिला ओलिसांना हमासने सोडले. पंच्याऐंशी आणि एकोणऐंशी वर्षांच्या ह्या वृद्ध महिला देखील हमासच्या रानटी हल्ल्यातून सुटल्या नव्हत्या, त्यांना मारबडव करत मोटारसायकलवरून गाझामध्ये नेण्यात आले होते. यातून हल्लेखोरांची माथेफिरू वृत्ती आणि विकृतीच दिसते. हमासचे काही दहशतवादी इस्रायलच्या दक्षिण भागातून पकडले गेले होते, त्यांच्याकडून जी माहिती उघड झाली आहे ती हमासच्या सात ऑक्टोबरच्या हल्ल्याचे कसे पूर्ण नियोजन केले गेले होते ते दर्शवते. हल्ला चढवताना अंदाधुंद गोळीबार करा, दिसेल त्याला ठार मारा, घराघरांत घुसून कुटुंबेच्या कुटुंबे संपवा, छोटी मुले, वृद्ध, तरुण स्त्रिया यांना गाझामध्ये पळवून आणा, असे स्पष्ट निर्देश हमासने आपल्या हल्लेखोरांना दिले होते. हमासचे हे कमांडर स्वतः गाझातील भुयारी जाळ्यामध्ये सुरक्षित लपले होते. त्यांनी हल्लेखोरांना हजारो डॉलरांच्या, अपार्टमेंटस्च्या बक्षिसांचे आमीष दाखवून आपल्याला हवे ते क्रौर्य घडवून आणले. गेल्या दोन आठवड्यांहून अधिक काळ इस्रायल हमासच्या नायनाटासाठी अहोरात्र प्रयत्नशील असले, तरी गाझातील भुयारी जाळ्यामुळे ते अजूनही शक्य झालेले नाही आणि प्रत्यक्ष जमिनीवरची कारवाई करण्यासही इस्रायलचे राजकीय नेतृत्व अजूनही मागेपुढे होते आहे. गाझामध्ये हमासने जवळजवळ पाचशे किलोमीटर लांबीच्या तब्बल तेराशेहून अधिक सुसज्ज भुयारांचे आणि बंकर्सचे जाळे आजवर विणलेले आहे. दैनंदिन सुखसुविधांपासून क्षेपणास्त्रे आणि दारूगोळ्यापर्यंत तेथे सर्व काही आहे. जमिनीच्या खाली तीस ते सत्तर फूट खोलवर काँक्रिटने भक्कम केलेले हे बंकर आहेत. तेथे विजेपासून पाण्यापर्यंतच्या सर्व सोयी आहेत. हमासचे प्रमुख नेते तेथेच राहत असल्याचा आणि त्यांची कमांड सेंटरेही तेथे असल्याचा संशय आहे. सीरिया आणि इराकमध्ये आयसिसच्या बंडखोरांनी ज्या प्रकारे आपले भूमिगत तळ उभारले होते, त्यापासून प्रेरणा घेऊन हमासने ही यंत्रणा उभारलेली आहे. त्याच्याच जोरावर त्यांनी इस्रायलला नामोहरम केले आहे. इस्रायली सेना उद्या गाझात प्रत्यक्षात घुसली तर वरून, खालून आणि समोरून अशा तिन्ही बाजूंनी त्यांच्यावर प्रतिहल्ला चढवला जाऊ शकतो. ह्या भुयारांची तोंडे नागरी वस्त्यांतील निवासी इमारतींत उघडतात. काही प्रवेशद्वारे तर शाळांमध्ये, मशिदींमध्ये हॉस्पिटलांमध्येही आहेत. इस्रायल नागरी विभागांतही हल्ले चढवते आहे ते त्यामुळेच. हमासचा आणि त्याचे समर्थन करणाऱ्या सीरिया आणि गाझातील इस्लामिक जिहाद, लेबनॉनमधील हिज्बुल्ला आदींचा नायनाट हे एकमेव उद्दिष्ट सध्या इस्रायलने समोर ठेवलेले असले, तरी सध्या इस्रायलच्या अहोरात्र चाललेल्या हल्ल्यांची जी झळ सामान्य पॅलेस्टिनींना बसते आहे, त्यातून नवे दहशतवादी निर्माण होऊ शकतात. गाझापट्टी ही क्षेत्रफळाच्या बाबतीत चिंचोळी असली, तरी जगातील सर्वांत दाट लोकवस्तीचा हा प्रदेश आहे हे विसरून चालणार नाही. तेथील लोकसंख्येतील तरुणांची संख्या लक्षणीय आहे. हमासला हल्लेखोरांची कमी पडणार नाही एवढे तरूण गाझामध्ये आहेत. इराण आणि इतर अरब देशांतून येणारा पैशाचा आणि इतर साधनसुविधांचा ओघ आहे. त्याच्या जोरावरच तर हमास उडते आहे. त्यामुळे इस्रायलला हमासला संपूर्ण नष्ट करणे तसे सोपे नाही. फार तर त्याची सध्याची नेतृत्वाची फळी इस्रायल उद्ध्वस्त करू शकेल, पण त्यांची जागा नवे माथेफिरू तरूण घेतील त्याचे काय? त्यामुळे केवळ हमास संपवणे पुरेसे नसेल. गाझाचे पुढे काय करायचे ह्याचा विचारही इस्रायलला करावा लागेल.