न्यूयॉर्कमध्ये गोळीबार; १६ जखमी

0
9

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये ब्रूकलिन सबवे स्टेशनवर काल गॅस मास्क घालून आलेल्या एका अज्ञात हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात जवळपास १६ जण गंभीररित्या जखमी झाले. अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. या घटनेनंतर संपूर्ण न्यूयॉर्क शहरात हायअलर्ट जारी करण्यात आला असून, मेट्रोसेवा बंद करण्यात आली आहे.

ब्रूकलिन येथील ३६ स्ट्रीट सबवे स्टेशनवर हा हल्ला झाला. बांधकाम मजुराचे नारिंगी रंगाचे कपडे तसेच गॅस मास्क घालून स्टेशनमध्ये घुसलेल्या हल्लेखोराने बेछूट गोळीबार केला. त्यात १६ जण जखमी झाले. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
घटनास्थळावरून न फुटलेले स्फोटकही ताब्यात घेण्यात आले आहे. हा हल्लेखोर चेहर्‍यावर गॅस मास्क घालून आला होता. त्याने प्रवाशांना पाहताच गोळीबार सुरू केला. त्यामुळे एकच धावपळ उडाली. स्फोटकांचे आवाजही ऐकू आले आणि सर्वत्र धुरही पसरला होता. हल्लेखोराने आधी धूर निर्माण केल्याने प्रवाशांना पळून जाता आले नाही.

सुरुवातीला दोन हल्लेखोर होते अशी माहिती मिळाली होती; मात्र हल्लेखोर एकच होता, असे नंतर स्पष्ट करण्यात आले. हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला असला, तरी पुढील धोका लक्षात घेत संपूर्ण शहरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.