न्यूझीलंडचा विजयी चौकार

0
114

>> केन विल्यमसनचे समयोचित शतक

>> चौथ्या पराभवामुळे दक्षिण आफ्रिका संकटात

न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा ४ गडी व ३ चेंडू राखून पराभव करत क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेतील आपला चौथा विजय नोंदविला. या विजयासह त्यांनी गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळविले आहे. चौथ्या पराभवामुळे दक्षिण आफ्रिका संघाची ‘अंतिम चार’ प्रवेशाची आशा जवळपास मावळली आहे. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी ठेवलेले २४२ धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने ४८.३ षटकांत गाठले. कर्णधार केन विल्यमसच्या १२व्या एकदिवसीय शतकामुळे किवीजला आव्हानात्मक लक्ष्य गाठणे शक्य झाले. दक्षिण आफ्रिकेने ढिसाळ क्षेत्ररक्षण करताना बहाल केलेल्या धावा व विकेट घेण्याच्या गमावलेली संधी न्यूझीलंडच्या पथ्यावर पडल्या.

तत्पूर्वी, पावसाने व्यत्यय आणल्यामुळे सामना सुमारे दीड तास उशीरा सुरु झाला. त्यामुळे सामना प्रत्येकी ४९ षटकांचा करण्यात आला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करणार्‍या आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. बोल्टने सलामीवीर क्विंटन डी कॉकचा वैयक्तिक ५ धावांवर त्रिफळा उडवत आफ्रिकेला पहिला धक्का दिला. खेळपट्टीकडून गोलंदाजांना मदत मिळत असल्यामुळे आमलाने स्थिरावण्यासाठी वेळ घेत मोजूनमापून फटके खेळले. तिसर्‍या स्थानावर उतरलेल्या कर्णधार फाफ ड्युप्लेसीने आमलासह दुसर्‍या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली. लॉकी फर्ग्युसनने ताशी १४८ किलोमीटर वेगाने टाकलेल्या अचूक यॉर्करला ड्युप्लेसीकडे उत्तर नव्हते. आमलाने ऐडन मार्करमसह छोटेखानी भागीदारी करत संघाचे शतक फलकावर लगावले. या दरम्यान त्याने आपले ३८वे वनडे अर्धशतक पूर्ण केले. मिचेल सेंटनरने त्याला बाद करत आफ्रिकेची जोडी फोडली.

यानंतर मधल्या फळीत नवोदित रस्सी वेंडर दुसेनने परिस्थिती ओळखून खेळ केला व नंतर हाणामारीच्या षटकांत गियर बदलताना फटकेबाजी केली. त्याने आपले सहावे एकदिवसीय अर्धशतक लगावताना संघाला दोनशे पार नेले. त्याने ६४ चेंडूंत नाबाद ६७ धावा जमवत २ चौकार व ३ षटकारांसह आपली खेळी सजवली. द. आफ्रिकेने निर्धारित ४९ षटकांत २४१ धावा केल्या. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसनने ३, तर ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी ग्रँडहोम आणि मिचेल सेंटनर यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

धावफलक
दक्षिण आफ्रिका ः क्विंटन डी कॉक त्रि. गो. बोल्ट ५, हाशिम आमला त्रि.गो. सेंटनर ५५, फाफ ड्युप्लेसी त्रि. गो. फर्ग्युसन २३, ऐडन मार्करम झे. मन्रो गो. ग्रँडहोम ३८, रस्सी वेंडर दुसेन नाबाद ६७, डेव्हिड मिलर झे. बोल्ट गो. फर्ग्युसन ३६, आंदिले फेहलुकवायो झे. विल्यमसन गो. फर्ग्युसन ०, ख्रिस मॉरिस नाबाद ६, अवांतर ११, एकूण ४९ षटकांत ६ बाद २४१

गोलंदाजी ः मॅट हेन्री १०-२-३४-०, ट्रेंट बोल्ट १०-०-६३-१, लॉकी फर्ग्युसन १०-०-५९-३, कॉलिन डी ग्रँडहोम १०-०-३३-१, मिचेल सेंटनर ९-०-४५-१
न्यूझीलंड ः मार्टिन गप्टिल स्वयंचित गो. फेहलुकवायो ३५, कॉलिन मन्रो झे. व गो. रबाडा ९, केन विल्यमसन नाबाद १०३ (१३८ चेंडू, ८ चौकार, १ षटकार), रॉस टेलर झे. डी कॉक गो. मॉरिस १, टॉम लेथम झे. डी कॉक गो. मॉरिस १, जिमी नीशम झे. आमला गो. मॉरिस २३, कॉलिन डी ग्रँडहोम झे. ड्युप्लेसी गो. एन्गिडी ६० (४७ चेंडू, ५ चौकार, २ षटकार), मिचेल सेंटनर नाबाद २, अवांतर ८, एकूण ४८.३ षटकांत ६ बाद २४५
गोलंदाजी ः कगिसो रबाडा १०-०-४२-१, लुंगी एन्गिडी १०-१-४७-१, ख्रिस मॉरिस १०-०-४९-३, आंदिले फेहलुकवायो ८.३-०-७३-१, इम्रान ताहीर १०-०-३३-०

तीन हजारी मिलर
दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज डेव्हिड मिलर याने वनडे क्रिकेटमध्ये काल तीन हजार धावा पूर्ण केल्या. द. आफ्रिकेकडून वनडे क्रिकेटमध्ये तीन हजारांहून जास्त धावा करणारा ाते सतरावा खेळाडू ठरला. मिलरच्या नावावर १२५ सामन्यांतील १०९ डावांत ३८.८०च्या सरासरीने ३०२७ धावांची नोंद आहे.

आमलाच्या आठ हजार धावा पूर्ण
दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर हाशिम आमला याने काल न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात आठ हजार एकदिवसीय धावांचा टप्पा ओलांडला. सर्वांत कमी डावांत आठ हजार धावा पूर्ण करणारा विराट कोहलीनंतरचा तो दुसरा खेळाडू बनला. आमलाला विराटचा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी होती. परंतु, असातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला दुसर्‍या स्थानी समाधान मानावे लागले. मागील सहा डावांत त्याला केवळ १३५ धावा करता आल्या आहेत. आठ हजार किंवा त्याहून अधिक धावा करणारा आमला हा दक्षिण आफ्रिकेचा चौथा खेळाडू ठरला. जॅक कॅलिस, एबी डीव्हिलियर्स व हर्षल गिब्स यांच्या पंक्तीत त्याने स्थान मिळविले आहे.
आमलाच्या वनडे कारकिर्दीतील टप्पे ः १००० ः २४ डाव, २००० ः ४० डाव, ३०००ः ५७ डाव, ४००० ः ८१ डाव, ५००० ः १०१ डाव, ६००० ः १२३ डाव, ७००० ः १५० डाव, ८००० ः १७६ डाव.