नोव्हेंबरअखेर किंवा डिसेंबरमध्ये जिल्हा पंचायत निवडणूक शक्य

0
255

>> राज्य निवडणूक आयोगाशी सरकारची चर्चा

राज्य सरकारने जिल्हा पंचायतीची स्थगित ठेवण्यात आलेली निवडणूक घेण्यासाठी हालचाल सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयोगासोबत निवडणुकीच्या मतदानाचा दिवस निश्‍चिती करण्यासाठी सरकारकडून चर्चा सुरू करण्यात आली असून नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी किंवा डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी मतदान घेतले जाऊ शकते.
बिहारच्या धर्तीवर राज्यातील जिल्हा पंचायत निवडणूक घेतली जाऊ शकते, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकारांशी बोलताना नुकतेच केलेले वक्तव्य त्यादृष्टीने बोलके आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या मार्च २०२० मध्ये होणारी जिल्हा पंचायत निवडणूक स्थगित ठेवण्यात आली होती. या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी केवळ मतदान घेणे शिल्लक आहे. या निवडणुकीची प्रचार फेरी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे आता जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी थेट मतदान घेतले जाणार आहे. जिल्हा पंचायत निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पालिका निवडणुकीवरही चर्चा
राज्यातील अकरा नगरपालिकांच्या मंडळांची पुढे ढकलण्यात आलेली निवडणूक येत्या डिसेंबर – जानेवारीमध्ये घेतली घेण्यावर विचारविनिमय केला जात आहे. नगरपालिकांच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला अजून सुरुवात करण्यात आलेली नाही. नगरपालिका निवडणुकीसाठी प्रारंभापासून प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. या नगरपालिका निवडणुकीची तारीख निश्‍चित करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा केली जात आहे. या दोन्ही निवडणुकांसाठी तारीख निश्‍चित झाल्यानंतर अधिकृत घोषणा केली जाणार आहे, असेही सूत्रांनी सांगितले.