नोकरीचे स्वप्न पूर्ण व्हावे!

0
21
  • संकेत बांदोडकर
    (गोवा इंजिनिअरिंग कॉलेज-
    फार्मागुडी-फोंडा)

मी सध्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असल्यामुळे येत्या नवीन वर्षात मला माझ्या स्वप्नातला जॉब मिळावा अशीच अपेक्षा आहे. आणि अर्थातच मनासारखी नोकरी मिळाल्यानंतर लवकरच मी त्यामध्ये स्थिरस्थावर व्हावे आणि माझे भविष्य उज्ज्वल असावे अशी अपेक्षा मी करतो. त्यासाठी मी भरपूर मेहनत करीन आणि माझ्या कोडिंग स्किल्स सुधारण्याचा प्रयत्न करीन.
पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वर्षी कोरोनापासून सगळ्यांचा बचाव व्हावा. कारण ‘जान है तो जहॉं हैं|’ यासाठी प्रत्येकाने स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!

…………………………

जीवन आम्हाला कळले हो!

  • गीतांजली शंबा म्हापसेकर
    (केसरकरवाडा मोर्लेम-सत्तरी)

गेल्या वर्षामध्ये म्हणजे २०२१ मध्ये माझ्या जीवनात खूप काही प्रसंग घडले. पहिला म्हणजे कोविड-१९. या कोरोनामुळे खूप लोकांचे जीवन उध्वस्त झाले. काही जणांच्या जीवनात अनेक संकटे येऊन गेली. या आजारामुळे शेतकरी, दुकानदार, कामगार या लोकांना दोन वेळचे जेवणसुद्धा मिळाले नाही. परंतु आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सर्वांना मोफत रेशन देऊन मदत केली. यंदाच्या २०२२ या वर्षात हे सर्वकाही निपटून आपण पुढे जाणार आहोत आणि जीवन म्हणजे खरं काय याचा अर्थ लक्षात घेऊन जगणार आहोत. जीवन म्हणजे कधी आशेचा खोल समुद्र तर कधी निराशेचा उंच डोंगर. गेल्या वर्षी मला माझ्या शाळेची खूप आठवण येत होती. मी माझ्या ऑनलाइन शिक्षणाला कंटाळली होती. या लॉकडाउनमुळे मला बाहेर फिरायलासुद्धा जायला मिळालं नाही. आता या नवीन वर्षामध्ये सर्वकाही ठीक होऊ दे, अशी मी देवाकडे प्रार्थना करते आणि सर्वांना संकटमुक्त व्हायला मदत होईल अशी आशा बाळगते. तुम्हा सर्वांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

………………………………………….

खूप काही गमावले…

  • अक्षता अशोक माईणकर-
    (विद्या प्रबोधिनी महावि. पर्वरी)

वर्ष म्हणजे एक चलती गाडी आहे. या वर्षामध्ये आपण खूप काही कमवतो तसेच गमवतो. हल्लीचे दिवस तर फारच दुष्काळी गेलेले आहेत. या कोरोना महामारीने सबंध लोकांना लुटून आपले राज्य बनवलेले आहे. परंतु या कोरोनाला साथी बनवायला आपण मनुष्यच कारणीभूत ठरतो. म्हणून मी देवाकडे प्रार्थना करते की येणारे २०२२ हे वर्ष सर्वांना सुखमय आणि आनंदाचे जावो. गेलेले वाईट क्षण परत न आणता येणारे चांगले क्षण आपण मजेत घालवू आणि होईल तेवढ्या लवकरात लवकर आपण आपणास मुक्त करण्याची जबाबदारी स्वीकारू. तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या कुटुंबाकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
……………………………….

सकारात्मक दृष्टिकोन ठेवा…

  • दिव्या सांगोडकर
    (आताफोंडे- मयडे)

आपण जगतो ते म्हणजे आपल्या आयुष्याचे ध्येय किंवा स्वप्न पूर्ण करण्यासाठी. पण ते पूर्ण करत असताना आपण बर्‍याच गोष्टी गृहीत धरतो किंवा लोकांकडून अपेक्षा ठेवतो व पूर्ण झाल्या नाही तर निराश होतो आणि ह्या ध्येेयाला कुठेतरी पूर्णविराम लागतो. त्यामुळे गोष्टी गृहीत धरू नये व लोकांकडून अपेक्षाही ठेवू नये. स्वतःचे काम स्वतःच करायचे.
तसेच आयुष्यात अनेक चढ-उतार असतात. संकट पार करू शकत नाही म्हणून बर्‍याचदा आपण उदास होतो. असे न करता प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला हवा व प्रत्येक क्षणाकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला हवे. २०२२ हे नवीन वर्ष आपल्या सगळ्यांसाठी सुख-समाधानाचे असेल हीच अपेक्षा. सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा!
……………………………

वर्ष सरले… वेळेचे महत्त्व ओळखा

  • प्राजक्ता बायेकर
    (कला-३, विद्या प्रबोधिनी महावि. पर्वरी)

बघता बघता २०२१ हे वर्ष कसे सरले ते कळलेसुद्धा नाही. जरी वर्षभरात अनेक संकटांचा सामना आपल्या सगळ्यांनाच करावा लागला असेल. पण वर्ष सरल्यावर आपल्याला वेळेचं महत्त्व कळतं. वेळ हा सोन्यापेक्षा अधिक मौल्यवान आहे. एक वेळा गेलेलं सोनं परत मिळू शकतं पण गेलेली वेळ आपल्याला कधीच मिळू शकत नाही. वेळ ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. वेळ आपल्यानुसार नाही, तर आपल्याला वेळेनुसार चालावे लागते, तरच आपण त्या वेळेचा उत्तम प्रकारे उपयोग करू शकतो. अन्यथा आपला वेळ कसा वाया जातो हेदेखील आपल्याला कळत नाही. प्रत्येक माणसाला वेळेचे महत्त्व माहीत असले पाहिजे. कारण आपल्याला आयुष्य हे एकदाच मिळते व याच आयुष्यामध्ये आपण काय करायचे आहे ते करू शकतो. लोक म्हणतात की वेळ कधीच सारखा नसतो, तो नेहमी बदलतो, कधीकधी तो वाईट असतो तर कधी चांगला असतो. काही व्यक्ती वेळेचे महत्त्व समजून आपली कामे वेळेवर करतात किंवा वेळेच्या अगोदर करतात म्हणजेच वेळेचा सदुपयोग करतात. तसेच काही व्यक्ती आपली कामे उद्यावर ढकलतात त्यामुळे ते जीवनात मागे राहतात. कारण वेळ कोणासाठी थांबत नाही.
उद्या करायची कामे आज करा आणि आज करायची कामे आताच करा… ही म्हण काही वेळा आपल्या कानावर पडते पण काही लोक ते ऐकून दुर्लक्ष करतात तर काही लोक ती आपल्या जीवनात आत्मसात करून पुढे चालतात. असलेला वेळ वाया घालवून रडत बसणे किंवा पश्चात्ताप करणे याला काहीही अर्थ नाही. म्हणून जर योग्य वेळी योग्य परिश्रम केले तर कष्टाचे योग्य फळ मिळणारच. प्रत्येक क्षण आयुष्यात आपल्याला यश प्राप्त करण्याची संधी देतो पण आपल्याला त्या क्षणाचा, संधीचा योग्य वापर करता आला पाहिजे.
वेळ ही एकमेव गोष्ट आहे जी आपल्याला आपल्या माणसांचे चेहरे दाखवते. ती माणसं खरोखर चांगली आहे की नाही हे आपल्या समोर आणते. कारण जेव्हा आपला वेळ खराब असतो त्या वेळेला जो माणूस आपल्या मदतीला पोहोचतो तोच आपला असतो, वेळेनुसार आपल्याला माणसांचे चेहरे ओळखता येतात. नवीन वर्षात तरी आपण वेळेचे महत्त्व ओळखून वेळेच्या आधीच काम पूर्ण करू या. सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा.