नोकरभरतीवरील निर्बंध हटवणार

0
127

>> १ डिसेंबरपासून कार्यवाही, मुख्यमंत्र्यांची पत्रपरिषदेत माहिती

राज्यात कोविड १९ च्या पार्श्‍वभूमीवर मार्च २०२० मध्ये सरकारी खर्च कपातीच्या उद्देशाने नवीन नोकरभरती, नवीन विकासकामांवर लादण्यात आलेले निर्बंध येत्या ३० नोव्हेंबर २०२० रोजी उठविण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्या विविध खात्यांत सुमारे १० हजार जागा रिक्त असून नवीन नोकरभरती आणि नवीन विकास प्रकल्पांची कामे मार्गी लावण्याच्या प्रक्रियेला डिसेंबर महिन्यापासून प्रारंभ केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

कोविड १९ महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक समस्येमुळे मार्च २०२० मध्ये नवीन विकासकामे, नवीन नोकरभरती आदींवर निर्बंध लागू करण्यात आले होते. केवळ महत्त्वाची कामे वित्तखात्याची मान्यता घेऊन मार्गी लावली जात आहेत. राज्यात अनलॉकडाऊन सुरू झाल्यानंतर मागील दीड दोन महिन्यात आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ लागली आहे. दोन दिवसांपूर्वी वित्तखात्याच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यात आला. विकास कामे, नोकरभरतीच्या कामाला चालना देण्यासाठी लादण्यात आलेले निर्बंध हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन विकासकामांची फाईल वित्तखात्याला पाठवून मान्यता घ्यावी लागत होती. ही प्रक्रिया सुटसुटीत केली जाणार आहे.

१ डिसेंबरपासून नोकर भरती, विकासकामांवर कोणतेही निर्बंध असणार नाहीत. संबंधित खात्याकडून विकासकामांच्या फाईल मंजूर केल्या जाणार आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. राज्य कर्मचारी भरती आयोगाकडून विविध खात्यातील सुमारे १० हजार नोकर्‍यांची भरती करताना काही अडचणींना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयोगाची मान्यता घेऊन काही खात्यातील तांत्रिक जागा त्या खात्यामार्फत भरण्यावर विचारविनिमय केला जात आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.पोलीस, लेखा, पंचायत, आरोग्य व इतर खात्यांत अनेक जागा रिक्त आहेत. संबंधित खात्याकडून नोकर भरतीसंबंधीच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

खाणीसाठी प्रयत्न सुरू
राज्य सरकारकडून खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्यात आलेली आहे. तथापि, कोविड महामारीच्या पार्श्‍वभूमीवर या याचिकेवरील सुनावणी लांबणीवर पडत आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.