कोळसा हाताळणी क्षमता वाढवल्याचे पुरावे सादर करा

0
111

>> दिगंबर कामत यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणीची क्षमता मी वाढवली असा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जो माझ्यावर आरोप केला आहे त्या संबंधीचे पुरावे त्यांनी सादर करावेत असे आव्हान विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी काल मुख्यमंत्र्यांना दिले.

मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणीत वाढ करू देण्यासाठी मी सही केलेली कागदपत्रे जर मुख्यमंत्र्यांकडे असतील तर त्यातील एक तरी कागद त्यांनी दाखवावा. कागदपत्र खिशात ठेवून आरोप करून काहीही साध्य होणार नसल्याचे कामत यांनी सांगितले. आपल्या कार्यकाळात आपण कधीही मुरगाव बंदरात कोळसा हाताळणीसाठीची क्षमता वाढवून दिली नसल्याचे कामत यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आपणावर केलेले आरोप हे खोटे व बिनबुडाचे असल्याचे सांगून यापूर्वीही आपल्यावर असे खोटे आरोप करण्यात आले होते असे कामत म्हणाले. माझ्यावर यापूर्वीच्या काळात कित्येक प्रकारचे नको ते आरोप करून मला संपवण्याचे प्रयत्न करण्यात आले मात्र मला कुणाचेही नाव घ्यायचे नाही असेही कामत पुढे म्हणाले.

२००७ ते २०१२ या दरम्यान, दिगंबर कामत सरकारच्या काळात मुरगाव बंदरावर कोळसा हाताळणीत दोनदा वाढ करण्यात आल्याचा आरोप मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केला होता. २०११ मध्ये सत्तेवर असलेल्या कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने मुरगाव बंदरात कोळसा हाताळणीत वाढ करण्याचा दोनदा निर्णय घेतला होता व दोन्ही वेळा त्याला गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरणीय मंजुरी दिली होती असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी म्हटले होते.

आव्हान स्वीकारले
मुरगांव बंदरावर कोळसा हाताळणीत आपण वाढ केल्याचा लेखी पुरावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी सादर करावा असे जे आव्हान विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी दिले आहे ते आपण स्वीकारले आहे. सदर पुरावा आपण पुढील अधिवेशनात सादर करणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले.