ओबामांचा चष्मा

0
129


अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ मध्ये त्यांनी राहुल गांधींवर केलेल्या शेरेबाजीवरून देशात वादळ उठले आहे. अजून हे पुस्तक अधिकृतरीत्या भारतात यायचे आहे, परंतु नुकतेच तब्बल ९०२ पानांचे पुस्तक आमच्यापर्यंत आले. आपल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकिर्दीतील ह्या आठवणी ओबामांनी दोन खंडांमध्ये लिहायला घेतल्या आहेत. अजून त्याचा केवळ हा एकच खंड प्रकाशित झालेला आहे व त्यामध्ये २०११ पर्यंतचा म्हणजे ओसामा बिन लादेनचा खात्मा होईपर्यंतचा कालखंड आलेला आहे. त्यामुळे भारतातील मोदीपर्वासंबंधीची त्यांची मते अर्थातच दुसर्‍या खंडामध्ये येतील, परंतु पहिल्या खंडात मुख्यत्वे डॉ. मनमोहनसिंग यांच्या भारतातील पंतप्रधानपदाच्या कालावधीसंबंधीचे भाष्य आलेले आहे. मात्र, सध्या वाद उफाळला आहे तो त्यांनी त्यात राहुल गांधींवर केलेल्या शेरेबाजीवरून.
राष्ट्राध्यक्ष बनलेले ओबामा नोव्हेंबर २०१० साली प्रथमच चार दिवसांच्या भारतभेटीवर आले होते, तेव्हाच्या आठवणी या पुस्तकामध्ये पृष्ठ क्र. ५९७ ते ६०१ मध्ये आहेत. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी यजमान या नात्याने ओबामांना शाही मेजवानी दिली, तेव्हाच सोनिया व राहुल यांच्याशी ओबामांची भेट झाली, त्यासंबंधीची ही निरीक्षणे आहेत. ‘‘राहुलच्या बाबतीत सांगायचे तर तोे स्मार्ट आणि प्रामाणिक वाटतो. त्याला त्याच्या आईसारखे चांगले रूप लाभले आहे. प्रागतिक राजकारणाच्या भवितव्याप्रतीचे आपले विचार त्याने मांडले, अधूनमधून माझ्या २००८ च्या प्रचारासंबंधीही विचारणा करीत राहिला, पण त्याच्यातला एक अस्वस्थ गुण म्हणजे जणू एखादा विद्यार्थी – ज्याने आपला गृहपाठ केलेला आहे आणि आपल्या शिक्षकाला प्रभावीत करू पाहतो आहे, पण खोल कुठे तरी त्याच्यापाशी त्या विषयावर प्रावीण्य मिळवण्यासाठी लागणारी योग्यता व आवड याची कमतरता आहे.’’ असे ओबामांनी त्या भेटीत अनुभवलेल्या राहुल यांच्याविषयी परखडपणे लिहिले आहे. कॉंग्रेस पक्षाची सध्याची सर्वत्र चाललेली धूळधाण, त्याला योग्य दिशा देण्यात राहुल गांधी यांना आलेले अपयश या सार्‍या पार्श्वभूमीवर ओबामांची ही शेरेबाजी आलेली असल्याने कॉंग्रेस विरोधकांना जरूर उकळ्या फुटत असतील, परंतु ओबामांनी या पुस्तकामध्ये भारतीय जनता पक्ष, उजवी विचारसरणी याविषयी व्यक्त केलेली मतेही अनुकूल दिसत नाहीत, हेही विसरून चालणार नाही. भाजपाकडे ओबामा ‘विभाजनकारी राष्ट्रवादा’चा प्रणेता म्हणूनच पाहतात. जगभरात मूलतत्त्ववादी चळवळींना पुन्हा वाव मिळू लागला आहे, मग त्याला भारत तरी अपवाद कसा असेल, असे ते विचारतात याकडेही लक्ष देणे जरूरी आहे.
ओबामांनी खरी प्रशंसा केली आहे ती डॉ. मनमोहनसिंग यांची. त्यांच्याविषयी त्यांनी अत्यंत आदराने लिहिले आहे. त्यांच्यात व आपल्यात कसे ऊबदार व फलप्रद नातेसंबंध प्रस्थापित झाले त्याविषयी त्यांनी लिहिले आहे. ‘असामान्य शहाणपण आणि शालीनता’ असलेली व्यक्ती म्हणून ओबामा मनमोहन यांचा गौरव करताना दिसतात. ‘ज्ञानी, विचारशील आणि अत्यंत प्रामाणिक’ अशा सिंग यांच्याप्रती ते नतमस्तक होताना दिसतात.
भारतासंबंधीची ओबामा यांची मते मात्र पारंपरिक पाश्‍चात्त्य दृष्टिकोन दर्शवणारीच आहेत. ‘‘जात आणि धर्म यांनी विभागलेले, भ्रष्टाचारी आणि दलालांनी भरलेले, नोकरशाहीच्या कब्जातले, अराजकयुक्त गरीब ठिकाण’’ असाच त्यांना भारत दिसतो. ओबामांचे बालपण इंडोनेशियात गेले. बालपणी आपण कसे रामायण – महाभारतातल्या गोष्टी ऐकत मोठे झालो, कॉलेजमधल्या मित्रांनी आपल्याला बॉलिवूडची ओळख कशी घडवली, डाळ आणि खिमा कसा खायला घातला त्याविषयीही त्यांनी सांगितले आहे, किंवा महात्मा गांधी यांचा आपल्यावर किती प्रभाव आहे आणि मुंबईतील मणीभवनला भेट दिली तेव्हा आपण कसे भारावून गेलो होतो त्याविषयी त्यांनी सांगितले आहे, परंतु आजच्या भारताविषयीची त्यांची प्रतिमा ही नकारात्मकच दिसते. समाजमाध्यमांवर ओबामांच्या शेरेबाजीवरून चाललेला धुमाकूळ अलाहिदा, परंतु एकूण अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदावरील व्यक्ती भारताकडे कशा रीतीने पाहते हे अस्वस्थ करणारे आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जरी उद्या आपल्या आठवणी लिहायला घेतल्या, तरीही भारताची हीच प्रतिमा त्यांच्यापर्यंत पोहोचवली गेलेली असेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची हीच छबी निर्माण झालेली आहे आणि आज मोदींच्या कार्यकाळामध्येही ती फारशी बदलली गेली असेल असे वाटत नाही. जो काही भारताचा उदोउदो बाहेर चालतो तो निव्वळ व्यापारी हिताखातर चालत असतो. भारतातील समस्त राजकारण्यांनी एकमेकांची उणीदुणी जरूर काढावीत, परंतु अंतिमतः देशाची ही आंतरराष्ट्रीय प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत हेच यातून सूचित होत नाही काय?