नोएडातील ट्विन टॉवर्स १० सेकंदात जमीनदोस्त

0
16

अनधिकृप बांधकाम केल्याप्रकरणी नोएडातील महाकाय ट्विन टॉवर्स अवघ्या १० सेकंदांमध्ये जमीनदोस्त करण्यात आले. यामध्ये ‘एपेक्स’ ही ३२ तर आणि ‘सेयान’ ही २९ मजल्यांची इमारत होती. या इमारती जमीनदोस्त करण्यात आल्यानंतर लगतच्या परिसरामध्ये धुळीचे प्रचंड साम्राज्य निर्माण झाले आहे. हे टॉवर्स पाडण्यासाठी तब्बल ३ हजार ७०० किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला.

बे बांधकाम पाडण्यात येत असताना नोएडा परिसरात ५६० पोलीस, १०० राखीव दलाचे जवान आणि चार एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या होत्या. नोएडातील सेक्टर ९३ – मधील ‘एमराल्ड कोर्ट गृहनिर्माण’ प्रकल्पातील या टॉवर्समध्ये ८५० फ्लॅट्स होते. नोएडा-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वे लगत बांधण्यात आलेल्या या टॉवर्सची उंची १०० मीटर होती. हे टॉवर्स पाडण्या अगोदर लगतच्या इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. टॉवर परिसराचा भाग सील करण्यात आला होता.

दीर्घकाळ न्यायालयीन लढाई
इमारतीसंदर्भातील नियम धाब्यावर बसवून नोएडातील हे ट्विन टॉवर्स अनधिकृतरित्या बांधण्यात आले होते. यासाठी ९ वर्षांची प्रदीर्घ न्यायालयीन लढाई सुरू होती. सुुपरटेक’ कंपनीच्या मालकीचे हे टॉवर्स पाडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ३१ ऑगस्ट २०२१ रोजी दिले होते. ‘सुपरटेक’ कंपनीला न्यू ओखला औद्योगिक प्राधिकरणाने ९ मजल्यांचे १४ टॉवर्स बांधण्याची परवानगी २००५ मध्ये दिली होती. यामध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि बागेचाही समावेश होता. त्यानंतर २००९ मध्ये या प्रकल्पात सुधारणा करत ‘एपेक्स’ आणि ‘सेयान’ हे दोन भव्य टॉवर्स बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठीच्या नवीन आराखड्याला नोएडा प्राधिकरणाकडून परवानगी देण्यात आली होती. अनधिकृत बांधकामाचा आरोप करत या प्रकल्पाविरोधात ‘द इमेरॉल्ड कोर्ट ओनर्स रेसिडेन्ट्स वेलफेअर’ने २०१२ मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली होती. बांधकाम अनधिकृत ठरवून २०१४ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने हे टॉवर्स पाडण्याचे आदेश दिले होते.

या निकालाविरोधात ‘सुपरटेक’ कंपनी आणि नोएडा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत हे टॉवर्स पाडण्याचे आदेश दिले होते.